ठाकरे-नाईक कुटुंबात आर्थिक व्यवहार, जमीन खरेदीची चौकशी करा; भाजपची मागणी
By कुणाल गवाणकर | Published: November 11, 2020 03:44 PM2020-11-11T15:44:52+5:302020-11-11T15:45:43+5:30
मुख्यमंत्री ठाकरे व्यवहाराची माहिती जनतेला देणार का?; भाजप नेते किरीट सोमय्यांचा सवाल
मुंबई: इंटिरियर डिझाईनर अन्वय नाईक यांच्या कुटुंबानं ठाकरे परिवाराशी आर्थिक व्यवहार केल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. त्या व्यवहाराची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेला द्यावी, अशी मागणी सोमय्यांनी केली.
रेवदंड्याच्या पलीकडे असलेल्या किल्ल्यापासून काही अंतरावर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली. २१ मार्च २०१४ रोजी यासाठी व्यवहार झाला. २ कोटी २० लाख रुपयांचा हा व्यवहार होता. ठाकरे आणि वायकर यांनी नाईक कुटुंबाकडे सदर जमीन खरेदी केली. नाईक कुटुंबासोबत असे आणखी किती व्यवहार झाले? अशा किती जमिनी घेण्यात आल्या?, असे सवाल सोमय्यांनी उपस्थित केले आहेत.
अन्वय नाईक, त्यांच्या पत्नी आणि मुलीचं नाव जमिनीच्या ७/१२ वर आहे. पण त्याच ७/१२ वर रश्मी छाकरे आणि मनिषा वायकर यांचीही नावं आहेत. त्यांचा या जमिनीशी संबंध काय? त्या का एकत्र आल्या? हा संपूर्ण व्यवहाराबद्दल जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सोमय्यांनी केली. रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांनी असे किती व्यवहार केले? ठाकरे आणि वायकर कुटुंबीयांमध्ये किती व्यवहार झाले, याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेसमोर ठेवणार का?, असे प्रश्न सोमय्यांनी विचारले.
सोमय्यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोणी कोणाकडून जमीन खरेदी करू नये का, असा सवाल त्यांनी उपस्थित केले. 'रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. त्याची माहिती आम्ही आयकर विभागाला, निवडणूक आयोगाला दिली. पार्टनरशिपमध्ये जमीन खरेदी करायला मनाई आहे का?' असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. अन्वय नाईक यांनी कोणामुळे आत्महत्या केली, त्याचा शोध लागायला हवा. पोलीस तो शोध घेतील, असंही ते पुढे म्हणाले.