हालचालींना वेग! विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
By मोरेश्वर येरम | Published: January 14, 2021 07:52 PM2021-01-14T19:52:43+5:302021-01-14T20:06:44+5:30
विश्वास नांगरे पाटील यांनी आज मुंबईल 'सिल्वर ओक' येथे शरद पवार यांची भेट घेतली.
मुंबई
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील थेट शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे याप्रकरणी आता हालचालींना वेग आला आहे. पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
पाहा: धनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण...
विश्वास नांगरे पाटील यांनी आज मुंबईल 'सिल्वर ओक' येथे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे प्रकरणासोबतच आणखी काही विषयांसाठी पवार यांनी नांगरे पाटील यांच्यासोबत चर्चा केली असल्याचं सांगितलं जात आहे.
पवारांच्या भेटीनंतर नांगरे पाटील थेट मुख्यमंत्र्यांकडे
शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर विश्वास नांगरे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झाले. सह्याद्री अथितीगृहावर विश्वास नांगरे पाटील आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.
शरद पवारांचं सूचक विधान
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवर शरद पवार यांनी आज दुपारी अतिशय सूचक विधान केलं होतं. "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे अतिशय गंभीर आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. आता पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल", असं शरद पवार म्हणाले आहेत.
धनंजय मुंडे प्रकरण विश्वास नांगरे पाटलांकडे?
धनंजय मुंडे यांना असलेलं तगडं राजकीय वलय आणि राज्याचं मंत्रीपद ते भूषवत असल्यानं त्यांच्यावरील आरोपांमुळे थेट पक्षाच्या व सरकारच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले असले तरी मुंडे यांनीही याआधी संबंधित महिलेविरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं असल्यानं त्याची चौकशी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे देण्याबाबत चर्चा झाल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.