Israel Election Result: मोठा पेच! इस्त्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू जिंकले, पण बहुमत नाही; अरबांचा 'राम' ठरला किंगमेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 09:27 AM2021-03-25T09:27:55+5:302021-03-25T09:29:33+5:30
Israel Election Result, Benjamin Netanyahu not get majority: बेंजामिन नेतन्याहू यांना सत्ता मिळवायची असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत 61 जागांचा आकडा गाठणे गरजेचे आहे. कारण पंतप्रधान नेतन्याहू यांच्या पक्षाची आघाडी आणि विरोधकांच्या आघाडीमध्ये खूप कमी अंतर आहे.
तेल अवीव: इस्त्रायलमध्ये मंगळवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल (Israel Election Result) नेहमीप्रमाणे 'कांटे की टक्कर' लागला आहे. या निकालानंतर 'राम' (Raam) नावाचा कट्टर अरब इस्लामिक पक्ष तिथे किंगमेकर बनला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत 90 टक्के मतमोजणी झाली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) मित्र असलेले बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांचा पक्ष लिकुड आणि त्यांच्या मित्रपक्षांना 59 जागा मिळत असल्याचे स्पष्ट झाले. इस्त्त्रायलच्या संसदेत 120 जागा आहेत. बहुमतासाठी नेतन्याहू यांना 61 जागांची गरज आहे. (Prime Minister Benjamin Netanyahu has claimed victory following Israel's fourth election in less than two years, but not winning seats. )
बेंजामिन नेतन्याहू यांना सत्ता मिळवायची असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत 61 जागांचा आकडा गाठणे गरजेचे आहे. कारण पंतप्रधान नेतन्याहू यांच्या पक्षाची आघाडी आणि विरोधकांच्या आघाडीमध्ये खूप कमी अंतर आहे. नेतन्याहूंच्या विरोधकांना 56 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच राम पक्षाला कमीतकमी 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे सत्ता स्थापनेत राम पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राम जर लिकुड पक्षाला समर्थन देत असेल तर नेतन्याहू यांचे पुन्हा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
नेतन्याहूंचा कट्टर राष्ट्रवाद अडचणीचा...
नेतन्याहूंना सत्ता स्थापनेत एकच अडचण आहे. नेतन्याहू हे कट्टर राष्ट्रवादी विचारधारेचे मानले जातात. ते फिलिस्तानींना सूट देणे आणि गाझा पट्टीमध्ये इस्त्रायली कॉलनींच्या विस्ताराला रोखण्याविरोधात आहेत. तर राम पक्षाची विचारधारा ही एकदम उलट आहे. यामुळे हे नेतन्याहूंना राम पक्ष साथ देण्याची शक्यता कमी आहे.
राम पक्षाने अद्याप कोणाला समर्थन द्यायचे हे ठरविलेले नाही. युनायटेड अरब लिस्ट, ज्याला हिब्रू भाषेत राम म्हटले जाते, हा पक्ष सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या नेतन्याहूंचे भविष्य ठरविणार आहे. विरोधी पक्षाचे नेते याईल लपिज यांनी संरक्षण मंत्री बेनी गांट्ज यांच्या सहयोगाने गेल्या वर्षी निवडणूक लढविली होती. मात्र, नेतन्याहू आणि गांट्ज यांच्यामध्ये सत्ता समीकरणे बनली आणि ते मागे हटले. आता पुन्हा लपिज यांनी नेतन्याहूंना हरविण्य़ाचा दावा करत प्रचार केला होता.
राम पक्षाबाबत...
राम पक्षा हा इस्त्रायलमधील अरब लोकांचे नेतृत्व करतो. यहुदी बहुल असलेल्या या देशात अरब मुस्लिमांची लोकसंख्या जास्त नाहीय. त्यांच्यातील अनेकजण वेगवेगळ्या पक्षाला मतदान करतात. राम पक्षाला पाच जागांवर विजय मिळणे हे पहिल्यांदाच घडले आहे.