वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं; अरविंद सावंतांचा अमित शाहंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 08:00 PM2021-02-07T20:00:59+5:302021-02-07T20:03:19+5:30
५०-५० चा फॉर्म्युला ठरल्यानंतर अमित शाहंनीच घोषणा केली होती, सावंत यांचं वक्तव्य
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संवाद साधताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शहा यांनी सांगितलं होतं. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अमित शाह यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागलं का? असं म्हणत टोला लगावला.
"अमित शाह यांना हे सर्व सांगायला सव्वा वर्ष लागलं. त्यातूनच किती पाणी मुरलंय हे कळून आलं. त्यांनी काय वेळ साधली. अमित शाह ज्यावेळी उद्धव ठाकरे यांना भेटले त्यावेळी ते केवळ पक्षप्रमुख होते. आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी विधानसभेत आणि विधानपरिषदेतही याचा पुनरूच्चार केला होता. त्यावेळीही कोणतं उत्तर आलं नाही. जेव्हा निवडणुकांचे निकाल लागले आणि थोडा वाद होत होता तेव्हा अमित शाह हे हरयाणात गेले. तेव्हा का सांगायला आले नाही?," असा सवाल सावंत यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी अमित शाहंवर निशाणा साधला.
"एकनिष्ठ, एक विचार आणि दिलेला शब्द मागे न घेणं यासाठी ठाकरे कुटुंबीय परिचित आहेत. आमचा ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता ज्या वेळी पत्रकार परिषद झाली त्यावेळी अमित शाहंनीच याची घोषणा केली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच खोलीत बसून झालेली फसवणूक उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही," असंही ते म्हणाले.
काय म्हणाले होते अमित शाह ?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शाह यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी थेट टीका केली. "शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे. बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करू असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री केलं. आम्ही वचन एकदा दिलं की पाळतो", असं अमित शाह म्हणाले.
शिवसेनेला मुख्यंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. मग तुमच्या पोस्टरवर मोदींचा फोटो सर्वात मोठा का छापला? मोदींच्या नावानं मतं का मागितली? प्रचारसभेत फडणवीसांना जेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बोलत होतो. तेव्हा तुम्हा का बोलला नाहीत?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.