पंतप्रधानांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे - चंद्राबाबूू नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:45 AM2019-01-26T05:45:37+5:302019-01-26T05:45:53+5:30
लोकसभा निवडणुकांत भाजपाचा पराभव निश्चित असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी पाठविण्याची वेळ जवळ आली आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.
अमरावती : लोकसभा निवडणुकांत भाजपाचा पराभव निश्चित असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी पाठविण्याची वेळ जवळ आली आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.
तेलुगू देसमच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भाजपाला सत्तेवरून घालविण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजुटीने प्रयत्न सुरू केले आहेत. देश वाचवा, लोकशाही वाचवा या घोषणा साऱ्या देशात दुमदुमत आहेत. जनहितविरोधी राजवट मतदारांना नको आहे. भाजपाशी राजकीय शत्रुत्व पत्करणे जसे अपरिहार्य होते, तसेच लोकशाही वाचविण्यासाठी मोदींना कडाडून विरोध करणेही आवश्यक आहे. पाच राज्यांच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपाचा झालेला पराभव पुरेसा बोलका आहे.
नायडू म्हणाले की, लोकसभा निवडणुकांत मोदींना हार पत्करावी लागणार असा जनमत चाचण्यांचाही निष्कर्ष आहे. आंध्र प्रदेशच्या हक्काचे १.६ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने अद्यापही दिलेले नाहीत. यासंदर्भात मी पंतप्रधान मोदी यांना पत्रही लिहिले. या राज्याकडे भाजपा जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. आंध्र प्रदेशला न्याय मिळावा यासाठी १५ पक्षांनी संसदेत केंद्र सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरले होते.