भाऊ-बहिणीच्या वादात आईचं ह्दय तुटलं; YSR रेड्डी कुटुंबात गृहकलह, बहिणीनं शोधला वेगळा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 07:46 PM2021-09-05T19:46:50+5:302021-09-05T19:51:07+5:30
जगन मोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात इतका टोकाचा वाद झालाय की, रक्षाबंधनाच्या दिवशी शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांना राखीही बांधली नाही.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि त्यांची बहीण शर्मिला यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. बहिण वाय. एस शर्मिलाने भावाच्या पाठिंब्याशिवाय आणि इच्छेविरुद्ध तेलंगनात वायएसआर तेलंगाना पार्टी (YSRTP) पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून दोन्ही भाऊ-बहिणींमध्ये दरी निर्माण झाली आहे. गुरुवारी वाय. एस राजशेखर रेड्डी यांच्या १२ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात याची झलक पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आई वाय. एस विजयलक्ष्मी यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यात पक्षातील ३०० जणांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु स्वत:च्या वडिलांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हजर राहिले नाही त्यामुळे लोक हैराण झाले. तर शर्मिला या आईसोबत कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी प्रखरतेने दिसून आल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री या सभेत न पोहचल्याने आई खूप दु:खी आहे.
दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार याआधी मुख्यमंत्री आई विजयम्मा आणि बहिण शर्मिलासोबत आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील इडुपुलापाया येथे वायआयआर घाटावर वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी ४० मिनिटं भाऊ-बहिणीच्या नात्यात दरार असल्याचं स्पष्ट दिसत होते. गुरुवारी वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांच्याविषयी खूप काही आठवणी ताज्या झाल्या. ही सभा एकप्रकारे पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित वाटत होती असं ज्येष्ठ पत्रकार जे या सभेत उपस्थित होते त्यांनी सांगितले.
या बैठकीत कुणीही बडा नेता उपस्थित झाला नाही परंतु जे कुणी आले ते वायएसआर यांच्या निकटचे आणि सध्या राजकारणात सक्रीय नाहीत ते होते. यात आई पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्वत:च्या मुलीसाठी समर्थन मागत असल्याचं दिसून आलं. यात शर्मिलानं आतापर्यंत तुम्ही माझ्या भावाला समर्थन दिलं आणि मला समर्थन देण्याची वेळ आलीय असं म्हटलं आहे. जगन मोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात इतका टोकाचा वाद झालाय की, रक्षाबंधनाच्या दिवशी शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांना राखीही बांधली नाही.
काही दिवसांपूर्वी शर्मिला यांनी केलेल्या ट्विटनेही सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यात शर्मिला म्हणाल्या की, बाबा, आपण सध्या एकाकी पडलोय, अडचणीच्या काळात तुम्ही नेहमी माझ्या पाठिशी उभे राहिलात. अडचणीचा सामना करताना प्रेमात कुठेही तडजोड करू नको असं तुम्ही सांगितलं होतं. आज मला होणारा त्रास पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू वाहत असतील. मी तुमच्यावर खूप प्रेम करते असं त्यांनी म्हटलं होतं.