बसपाच्या तोंडी ‘जय लोहिया’, सपाच्या मुखात ‘जय कांशीराम’!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 03:58 AM2019-03-16T03:58:27+5:302019-03-16T03:58:33+5:30

मायावती, अखिलेश यादव आघाडी; उत्तर प्रदेशातील राजकारण बदलले

'Jai Lohia' in the mouth of the BSP, 'Jai Kanshi Ram' at the mouth of SP | बसपाच्या तोंडी ‘जय लोहिया’, सपाच्या मुखात ‘जय कांशीराम’!

बसपाच्या तोंडी ‘जय लोहिया’, सपाच्या मुखात ‘जय कांशीराम’!

Next

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात आघाडी केलेल्या सपा व बसपाचे नेते जिंकण्याच्या ईर्षेने प्रचाराला लागले आहेत. बसपाचे नेते प्रचारसभांत ‘जय भीम, जय भारत’ याबरोबरच ‘जय लोहिया, जय समाजवाद’ या सपाच्या घोषणाही देऊ लागले आहेत, तर सपाचे नेते राममनोहर लोहिया यांना आदर्श मानत असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मायावती, कांशीराम यांचाही जयजयकार करू लागले आहेत.

सभेच्या ठिकाणी सपा, बसपाचे झेंडे एकत्रपणे दिमाखाने फडकत असतात. मात्र तरीही एक प्रश्न आवर्जून विचारला जातो की, सपाकडे असलेली यादवांची तसेच बसपाकडे असलेली जाटव यांची मते परस्परांच्या उमेदवारांना मिळवून देण्यात त्यांना यश येईल का? हे दोन्ही पक्ष सुमारे दोन दशके एकमेकांचे कट्टर राजकीय हाडवैरी होते. आग्रा येथील बसपाचे नेते रवींद्र पारस वाल्मिकी यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांचे या वेळी खऱ्या अर्थाने मनोमिलन झाले आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी १९९५ साली लखनऊच्या सरकारी विश्रामधामात मायावतींवर हल्ला केला होता. त्या घटनेपासून दोन्ही पक्षांत वितुष्ट निर्माण झाले होते. मात्र आता हा सारा इतिहास झाला.

जनतेच्या दबावामुळेच सपा, बसपाला लोकसभा निवडणुकांत आघाडी करावी लागली आहे. उत्तर प्रदेशात दोन्ही पक्षांच्या यादव व जाटव समुदायातील कार्यकर्त्यांमध्ये एकी होणार का यावर त्यांचे यश अपयश अवलंबून आहे. इटावा येथील कोठी बिचपुरा गावातील जाटव समाजातील शेतकरी रामदास म्हणाले की, सपाबरोबर आघाडी करून मायावतींनी दलितांचा अपेक्षाभंग केला आहे.

यादवांची मतेही बसपाला
सराय इसार गावातील शिशुपाल सिंह यादव यांनी सांगितले की, सपाची यादवांची मते बसपाच्या उमेदवारांना मिळण्यात काही अडचणी येतील असे वाटत नाही. मायावतींविषयी आमच्या मनात आकस नाही. योगी यांच्यापेक्षा मायावती-सपाचे सरकार केव्हाही चांगलेच असेल.

सपाचे सरकार असताना गुंडांना मोकळे रान होते. लोकसभा निवडणुकांनंतर गुंडांचे राज्य पुन्हा प्रस्थापित होणार असेल तर मग दलितांना कोण वाली उरणार? अर्थात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मात्र सर्व जाती आमच्याबरोबर असल्याचा दावा करीत आहेत.

Web Title: 'Jai Lohia' in the mouth of the BSP, 'Jai Kanshi Ram' at the mouth of SP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.