जम्मू-काश्मीर वेगळा पंतप्रधान प्रकरण: ...तर अब्दुल्लांनी पाकिस्तानात जावं, गौतम गंभीरचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 05:21 PM2019-04-02T17:21:00+5:302019-04-02T17:23:19+5:30
ओमर अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान असावा, अशी मागणी केली होती.
नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरसाठी वेगळ्या पंतप्रधानाची काही दिवसांपूर्वी मागणी केली होती. या मागणीवर जोरदार टीका झाली. आता तर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा सदस्य गौतम गंभीरने अब्दुल्ला यांच्यावर घणाघात केला आहे. जर अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान हवा असेल तर त्यांनी पाकिस्तानमध्ये राहायला जावं, अशी टीका गंभीरने केली आहे. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरने हे विधान केले आहे.
गंभीर म्हणाला की, " उमर अब्दुल्ला यांनी जम्मू-कश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान व्हायला हवा, अशी मागणी केली आहे आणि मला समुद्रावर चालायचे आहे, जर माझे वक्तव्य समजले नसेल तर त्यांनी पाकिस्तानमध्ये जावं."
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरसाठी वेगळ्या पंतप्रधानाची केलेली मागणीवरूनच आता मोदींनी विरोधकांना कात्रीत पकडलं आहे. मोदी एका रॅलीला संबोधित करताना म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान व्हावा, यांसारखी स्थिती निर्माण केली जातेय. अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या नेत्यांना काँग्रेस आणि महागठबंधनवाले समर्थन देणार आहेत काय, असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला आहे.
भाजपाच्या काही नेत्यांनी जम्मू-काश्मीरमधला 370 कलम संपवण्याच्या केलेल्या मागणीवर ओमर अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान असावा, अशी मागणी केली होती. तसेच जम्मू-काश्मीरच्या संरक्षणासाठी वेगळा पंतप्रधान त्या राज्याला मिळायलाच हवा, याचाही उल्लेख ओमर अब्दुल्लांनी केला.