"जयंत पाटील हे राजकारणात अनावधानानं आलेलं पात्र," गोपिचंद पडळकर यांची बोचरी टीका
By बाळकृष्ण परब | Published: January 23, 2021 04:49 PM2021-01-23T16:49:26+5:302021-01-23T16:57:43+5:30
Gopichand Padalkar : जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानाची चर्चा रंगली असतानाच भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
सांगली - मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील जलसंपदामंत्री जयंत पाटील हे राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान, जयंत पाटील यांच्या विधानाबाबत चर्चा रंगली असतानाच भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे, अशी टीका गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानावर पडळकर यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले की, जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर ते राजकारणात आले. अनुकंपा तत्त्वावर आलेल्यांची गुणवत्ता तपासली जात नाही, असा टोला गोपिचंद पडळकर यांनी लगावला.
यावेळी जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसलाही गोपिचंद पडळकर यांनी टोले लगावले. जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाबाबत बोलले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळेल, असं वाटत नाही. खरंतर हा पक्षच भविष्यात राहील की नाही हा प्रश्न आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला.
जयंत पाटील १९९० पासून राजकारणात आहेत. मात्र जिल्ह्यासाठी येईल ते मतदारसंघात न्यायचं याशिवाय वेगळं काही त्यांनी केलं नाही. इतक्या वर्षांच्या काळात केलेलं मोठं काम किंवा प्रकल्प ते सांगू शकत नाहीत, अशी टीकाही पडळकर यांनी केली.