मोदी मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधणार! ज्योतिरादित्य शिंदेंसह तिघांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 05:29 AM2021-01-07T05:29:37+5:302021-01-07T05:30:20+5:30
Jyotiraditya scindia News : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. आता नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची दाट शक्यता आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला वेढा घातला आहे. अन्यथा मागच्या महिन्यातच विस्तार झाला असता, असे सूत्रांनी सांगितले.
- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात ज्योतिरादित्य शिंदे, सुशील मोदी, वरुण गांधी, मुकुल रॉय यांच्याबरोबरच आणखी दोघांना संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच नव्या मुस्लिम चेहऱ्यालाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचे समजते.
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. आता नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची दाट शक्यता आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला वेढा घातला आहे. अन्यथा मागच्या महिन्यातच विस्तार झाला असता, असे सूत्रांनी सांगितले.
सद्य:स्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह २२ मंत्री आणि ३२ राज्यमंत्री आहेत. त्यात स्वतंत्र जबाबदारी असलेल्या राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत शिवसेना आणि अकाली दल यांनी भाजपप्रणीत रालोआला सोडचिठ्ठी दिल्याने अनुक्रमे अरविंद सावंत आणि हरसिमरत बादल यांच्या खात्यांचा अतिरिक्त कारभार इतरांकडे सोपविण्यात आला आहे. तसेच रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी या मंत्र्यांच्या निधनामुळे त्या जागाही रिक्त आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांकडे तीन ते चार खात्यांची अतिरिक्त जबाबदारी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे समजते. विद्यमान मंत्र्यांपैकी दोघांना पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असाही मतप्रवाह आहे.
दरम्यान, मकरसंक्रांतीचा मुहूर्त हुकल्यास पंतप्रधान मोदी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मार्च वा एप्रिलमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, अशी शक्यताही सूत्रांनी बोलून दाखवली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांना नववर्षाची भेट
मध्य प्रदेशात बंडखोरी करून भाजपला बळ देणारे ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन नववर्षाची भेट दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ज्योतिरादित्य यांनी लोधी इस्टेटमध्ये त्यांना देऊ करण्यात आलेल्या बंगल्या न जाता आनंद लोकमधील भाडेतत्त्वावरील घरात राहणे तूर्तास पसंत केले आहे.
मुस्लिम चेहऱ्याला संधी
मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ धोरणाला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून आणखी एका मुस्लिम चेहऱ्याला मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.