मुश्रीफ-चंद्रकांतदादा यांच्यात कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:31 PM2020-11-28T14:31:22+5:302020-11-28T14:34:32+5:30

Pune, Politics, chandrakant patil, Hasan Mushrif, kolhapur, vidhanparishad elecation पुणे पद‌वीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात मात्र महापालिकेच्या निवडणुकीसारखा कलगीतुरा सुरू आहे. त्यात गंमत म्हणजे पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांची चर्चाच उमेदवार व त्यांचे प्रचारकही विसरून गेले आहेत. मूळ मुद्दे सोडून निव्वळ राजकीय आरोपांचा धुरळा उडत आहे.

Kalgitura between Mushrif-Chandrakantdada | मुश्रीफ-चंद्रकांतदादा यांच्यात कलगीतुरा

मुश्रीफ-चंद्रकांतदादा यांच्यात कलगीतुरा

googlenewsNext
ठळक मुद्देवर्चस्व दाखविण्याचा आटापिटा पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न फाट्यावर

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : पुणे पद‌वीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात मात्र महापालिकेच्या निवडणुकीसारखा कलगीतुरा सुरू आहे. त्यात गंमत म्हणजे पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांची चर्चाच उमेदवार व त्यांचे प्रचारकही विसरून गेले आहेत. मूळ मुद्दे सोडून निव्वळ राजकीय आरोपांचा धुरळा उडत आहे.

खरंतर ही विधान परिषदेतील आमदार निवडून देण्याची निवडणूक. विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह म्हटले जाते. त्यामुळे या निवडणुकीतील मतदारही सुशिक्षित असतो. त्यामुळे प्रचारही मुद्द्याला धरून व्हायला हवा परंतु ती अपेक्षाच फोल ठरली आहे. गेल्या निवडणुकीतही असा प्रचार झाला नव्हता. या निवडणुकीत मुख्यत: भाजपकडून जास्त राजकीय तिखट हल्ले सुरू आहेत.

पुणे पदवीधरमध्ये भाजपचा आमदार होता. शिक्षक मतदार संघात विनाअनुदानित कृती समितीचे दत्तात्रय सावंत आमदार आहेत. त्यांनी निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता म्हणजे सध्या एक-एक बलाबल आहे; परंतु पद‌वीधरमध्ये चंद्रकांत पाटील यापूर्वी दोनवेळा निवडून आल्याने त्यांना ही जागा राखणे प्रतिष्ठेचे बनले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एक सुरक्षित मतदारसंघ तयार करता आला नाही म्हणून त्यांना कोथरूडमध्ये जावे लागले, अशी टीका त्यांच्यावर होत आली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्या हातून निसटला तर पक्षांतर्गतही त्यांना ते अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे त्यांनीही अस्तित्वाची लढाई म्हणून शड्डू ठोकला आहे.

मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैरत्वास जिल्हा बँकेतील राजकारणाचाही किनार आहे. बँकेच्या गेल्या निवडणुकीनंतर आमदार पाटील यांच्या पुढाकाराने मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदास सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाला होता; परंतु आमदार पी. एन. पाटील यांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने हे शक्य झाले नाही. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सत्तेचा वापर करून मुश्रीफ यांच्यावर कुरघोड्या केल्या.

मुश्रीफ हे असे नेते आहेत की त्यांना कायमच (रोजच म्हणा..) चर्चेत राहायला आवडते. यापूर्वी जेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोचरी टीका करत असत तेव्हा संघटनेला अंगावर घेऊन त्यांच्या टीकेला मुश्रीफ हेच प्रत्युत्तर देत होते. राष्ट्रवादीतील अन्य एकही नेता त्यावेळी तोंड उघडत नव्हता. आताही तसेच आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या कोणत्याही विधानाला सरकार महाविकास आघाडीचे असले तरी प्रत्युत्तर फक्त मुश्रीफ हेच देत आहेत. त्यांच्या या स्वभावानुसारच शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला मुश्रीफ यांनी उत्तर दिले. गंमत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातीलही एकाही शिवसेना नेत्याने अशा पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर दिलेले नाही. त्यामुळे मुश्रीफ आता पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही गुडबुकमध्ये स्थान बाळगून आहेत.

पदवीधरांचे प्रश्न
१) शिक्षण सेवक पद्धत रद्द करणे.
२) विविध पदांची भरती करणे.
३) सीएचबीधारकांना दरमहा नियमितपणे मानधन देणे.
४) पदवीधरांना बेरोजगार भत्ता देणे.
५) युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीचे नियोजन करणे.

शिक्षकांचे प्रश्न

१) जुनी पेन्शन योजना लागू करावी.
२) विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमांनुसार अनुदान द्यावे.
३) समान सेवाशर्ती लागू करणे.
४) शिक्षक, कर्मचाऱ्यांची भरती करणे.
५) वेतनोत्तर अनुदान पूर्ववत सुरू करणे.

Web Title: Kalgitura between Mushrif-Chandrakantdada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.