'कंगनासारखे 'उपरे' आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी!' नितेश राणेंचा शिवसेनेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 09:07 AM2020-09-07T09:07:38+5:302020-09-07T09:14:05+5:30
भाजपा आमदार नितेश राणे यांनी कंगनासोबतच्या वादावरून शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. तसेच कंगनाला उपरी म्हणणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला आहे.
मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात कंगना राणौत हिने केलेल्या विधानांनंतर कंगना आणि शिवसेनेमध्ये सध्या जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यातच कंगनाने शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने शिवसेनेने मुंबईचा स्वाभिमान आणि मराठी अस्मितेचा मुद्दा समोर आणला आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी या वादावरून शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. तसेच कंगनाला उपरी म्हणणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. कंगनासारखे उपरे आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन आणि पटानी अस्सल मराठी! हो ना?? असा चिमटा नितेश राणेंनी काढला आहे. तसेच टेंडर देताना आणि पार्ट्या करताना मराठी अस्मिता कुठे जाते? असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे.
Kangana सारखे "उपरे"
— nitesh rane (@NiteshNRane) September 7, 2020
आणि
Dino,Gomez,jacqueline,patani "अस्सल मराठी" !!
हो ना ??
टेंडर देताना आणि पार्ट्या करताना मराठी अस्मिता कुठे होती ???
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखामधून कंगनावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तिविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा, असे आवाहन या अग्रलेखातून करण्यात आले आहे, त्यावरून नितेश राणेंनी ही टीका केली आहे.
कंगनाबाबत काय म्हटले आहे सामनाच्या आजच्या अग्रलेखात
मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तिविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा. त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आहे. तितकाच तो भाजपाचाही असायला हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अवमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात. मुंबईत खाऊन पिऊन तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारुच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही. आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
मुंबईचा व पोलिसांचा अवमान करणाऱ्या त्या मेंटल महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री ठणकावून सांगत असतील तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे, हे मान्य करावे लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलिस आयुक्त आणि संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे, असे आवाहनही सामनामधून करण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे
म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड
…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा
५०० ट्रेन आणि १० हजार स्टॉप बंद होणार? रेल्वे तयार करतेय नवे वेळापत्रक