कपिल पाटील यांनी स्वीकारली पंचायत राज राज्यमंत्रिपदाची सूत्रे; केला तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत योजना पोचविण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 06:39 PM2021-07-12T18:39:51+5:302021-07-12T18:41:02+5:30
Kapil Patil News: केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन प्रशासनातील कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती.
- नितिन पंडीत
भिवंडी, ( दि. १२ ) केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रीपदाची सूत्रे सोमवारी स्वीकारली. तसेच देशभरातील तळागाळातील व दुर्गम भागातील ग्रामस्थांपर्यंत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना पोचविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन प्रशासनातील कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पंचायत राज मंत्रालयात पाटील यांनी सोमवारी राज्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, भाजपाचे प्रदेश सचिव विनोद तावडे उपस्थित होते.
पंचायत राज खात्याच्या माध्यमातून देशातील दोन लाख ७९ हजार ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी जाहीर केलेल्या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घराला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. या योजनेतून गावाचा विकास आराखडा करून त्याची टप्प्या-टप्प्यात अंमलबजावणी केली जाईल. पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तीन स्तरावर विभाजन करून ग्रामीण भागात आदर्श ग्राम योजना राबविली जाईल. त्यातून गावाच्या विकासाचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी मंत्री पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ग्राम विकास हा पायलट प्रोजेक्ट काही राज्यात राबविण्यात येईल. ई- ग्रामपंचायत योजनेची अंमलबजावणी करून गावांना आधुनिक विकासाची जोड, स्वयंपूर्ण गावासाठी आधुनिक ग्रामविकासाचा रोड मॅप केला जाणार आहे, असे पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांनी सूत्रे स्विकारल्यानंतर नमूद केले.
स्वतंत्र भारताच्या ७४ वर्षांनंतर ठाणे जिल्ह्याला प्रथम मंत्रीपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला आहे. पंतप्रधानांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून उल्लेखनीय काम करणार आहे, असे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी सांगितले.