आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून भाजपा मंत्र्यावर गंभीर आरोप, कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 08:12 AM2021-03-03T08:12:42+5:302021-03-03T08:23:33+5:30
Ramesh Jarkiholi’s offensive CD : एका सामाजिक कार्यकर्त्यांने ही सीडी जारी केली आहे, यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत.
नवी दिल्ली : कर्नाटकात एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्याभाजपा सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांने ही सीडी जारी केली आहे, यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. दरम्यान, याबाबत राजकीय षड्यंत्र असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. (karnataka minister ramesh jarkiholi in dock after a cd relased by a social activist)
नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण मीडियासमोर आणले आहे. तसेच, दिनेश कलहळ्ली यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे.
ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे.यासंदर्भात दिनेश कलहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे.
संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केली, असे दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटले आहे. बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी दिनेश कलहळ्ळी यांनी केली आहे.
राजकीय षड्यंत्र - रमेश जारकीहोळी
दरम्यान, याबाबत भाष्य करताना रमेश जारकीहोळी यांनी हे राजकीय षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. " याबाबात माझ्याजवळ एकच उत्तर आहे, हे राजकीय षड्यंत्र आहे. हे खोटे आहे. याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे", असे रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसची निदर्शने
या आक्षेपार्ह सीडी प्रकरणी मंगळवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी राज्यातील भाजपा सरकार आणि रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.