करणी सेनेची शिवसेनेला धमकी; "जर कंगना राणौतला हात लावला तर आमच्याशी गाठ आहे, याद राखा"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 11:45 AM2020-09-08T11:45:52+5:302020-09-08T11:55:50+5:30
या संपूर्ण वादामुळे केंद्र सरकारने कंगना राणौतला वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. मात्र त्यावरुन राज्य सरकारने केंद्रावर आणि भाजपावर टीका केली आहे.
जाहू – अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद पेटण्याची चिन्हे आहेत. कंगनानं मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा असं थेट आव्हान दिले होते. संजय राऊत यांनी मला मुंबई-महाराष्ट्रात येऊ नये अशी धमकी दिल्याचा आरोप कंगनाने केला होता. त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अशी थेट धमकी दिली होती.
या संपूर्ण वादामुळे केंद्र सरकारने कंगना राणौतला वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. मात्र त्यावरुन राज्य सरकारने केंद्रावर आणि भाजपावर टीका केली आहे. आता यात हिमाचल प्रदेशातील करणी सेनेने शिवसेनेला इशारा दिला आहे. करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष पीयूष चंदेल यांनी सांगितले आहे की, कंगना राणौत ही हिमाचल प्रदेशाची शान आहे. एकट्या कंगनानं बॉलिवूडमधील ड्रग्स माफियांचा पर्दाफाश केला आहे. सुशांत सिंग प्रकरणातही कंगनाने इतक्या जिद्दीने पुढे आली त्यामुळेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असं ते म्हणाले.
ड्रग्स प्रकरणात अनेक मोठे लोक यात अडकण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा निषेध करतो. जर हिमाचल प्रदेशच्या मुलीला हात लावला तर शिवसेनेने महाराष्ट्रात करणी सेनेशी मुकाबला करण्यासाठी तयार राहावं. जर कंगनाला हवं असेल तर करणी सेना तिच्या लढाईत तिच्या खांद्याला खांदा मिळवून काम करायला तयार आहे. कंगना राणौत ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. त्यावेळी करणी सेनेचे कार्यकर्ते एअरपोर्टपासून तिच्या घरापर्यंत तिचं संरक्षण करतील असंही पीयूष चंदेल यांनी सांगितले आहे.
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते
कंगनाला Y दर्जाची सुरक्षा
मुंबई पोलिसांसंदर्भातील वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता, केंद्र सरकारने कंगनाच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. यानंतर तिला मुंबईत येण्यासंदर्भात धमक्या दिल्या गेल्या होत्या. यासंर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांकडे कंगनाच्या सुरक्षिततेसंदर्भात मागणी केली होती. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोनानंतर आता दुसऱ्या महामारीसाठी सज्ज राहावं; WHO चा जगातील देशांना इशारा
“उद्धव जी, गलत नंबर डायल हो रहा है”; भाजपा नेते मुरलीधर राव यांचा शिवसेनेवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांवर भरवसा; शिवसेनेत पुन्हा एकदा दिली मोठी जबाबदारी
“आम्ही विचार केला त्यापेक्षा जास्त ‘नॉटी’ आहेत”; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
"विमानतळ, रेल्वे विकून बैलगाडी खरेदी करायचा प्लॅन आहे का?"; राष्ट्रवादीचा नरेंद्र मोदींना सवाल