Karunanidhi Death हिंदू असूनही करुणानिधींचं दफन का?; दहन का नाही?... 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 01:43 PM2018-08-08T13:43:50+5:302018-08-08T13:44:44+5:30
Karunanidhi Death: करुणानिधी हे पहिल्यापासुनच द्रविड आंदोलनाशी जोडले गेले होते.
मुंबई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे नेते एम करुणानिधी यांचे काल सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र, करुणानिधी हे हिंदू असूनही त्यांच्या मृतदेहाचे दहन न करता दफन करण्यात येणार आहे. काय आहे या मागचे कारण...
खरे तर करुणानिधी हे पहिल्यापासुनच द्रविड आंदोलनाशी जोडले गेले होते. द्रविड आंदोलनाची विचारसरणी ही ब्राम्हणवादाला उघडउघड विरोध करणारी आहे. तसेच त्यांनी आखून दिलेले रिती-रिवाजांना न मानणारी आहे. करुणानिधी यांच्या राजकीय प्रवासाची वीट हिंदू जाती व्यवस्था, धार्मिक रुढी आणि सामाजिक भेदभाव याच्या विरोधात रचली गेली होती. ते स्वत:ला नास्तिक असल्याचे सांगत असत. तसेच धार्मिक रुढी आणि अंधश्रद्धांवर प्रखर टीका करायचे. ते द्रविड आंदोलनाचा शेवटचा नास्तिक चेहरा होते. हिंदू धर्मातील रुढींविरोधात बोलने त्यांच्यासाठी नवे नव्हते.
हिंदू धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्ये करताना ते एकदा म्हणाले होते, की हिंदुंचा कोणता धर्म आहे का? हिंदू कोण आहे? जर तुम्ही उजव्या विचारसरणीच्या लोकांना विचारल्यास ते हिंदू धर्माचा अर्थ चोर आहे, असे सांगतिल.
द्रविड आंदोलनाशी जोडला गेलेला नेता आपल्या नावासोबत कधीही जात सांगणारे शब्द वापरत नाहीत. ते हिंदू धर्मातील कोणतेही कर्मकांड मानत नसल्याने त्यांचे मृतदेह दफन केले जातात. या आधीही अनेक द्रविडी नेत्यांचे मृतदेह दफन करण्यात आले आहेत. यामध्ये जयललिता यांचाही समावेश आहे. जयललिता या ब्राम्हण समाजाच्या होत्या. त्यांच्या मृतदेहाचे हिंदू पद्धतीने दहन केले नसले तरीही त्यांच्या नातेवाईकांनी श्रीरंगपट्टनममध्ये बाकीचे अंत्यविधी हिंदू पंरपरेनुसार केले होते. यासाठी त्यांनी मृतदेह म्हणून बाहुलीचा वापर केला होता.
या कारणांमुळेच करुणानिधी यांचा मृतदेह दहन न करता दफन केला जाणार आहे.