Kearl Assembly Elections: डाव्यांच्या जाहीरनाम्यात गृहिणींना पेन्शनचा शब्द; ४० लाख युवकांना देणार रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 06:30 AM2021-03-21T06:30:46+5:302021-03-21T06:31:15+5:30
निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समाजकल्याण, आरोग्य आणि शिक्षणावर वाढीव खर्च करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
तिरुअनंतपुरम : डाव्या लोकशाही आघाडीच्या (एलडीएफ) निवडणूक जाहीरनाम्यात ४० लाख युवकांना रोजगार आणि गृहिणींना प्रतिमाह २५०० रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
डाव्या लोकशाही आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी माकप राज्य समितीचे सचिव विजय राघवन आणि भाकपचे सचिव कन्नन राजेंद्रन यांच्यासह डाव्या लोकशाही आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते. केरळ विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न डाव्या आघाडीने जाहीरनाम्यात केला आहे.
निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समाजकल्याण, आरोग्य आणि शिक्षणावर वाढीव खर्च करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यामध्ये आधुनिक वाहतूक, शहरी पायाभूत सुविधा, औद्योगिक कॉरिडोर, उच्च-गती रेल्वे कनेक्टिव्हिटी, गरिबांसाठी मोफत घरे, सुधारित सार्वजनिक कल्याण पेन्शन, सुधारित सार्वजनिक सेवा, सदृढ बालक व वृद्धांची काळजी, बेरोजगार तरुणांसाठी वेगवान कौशल्य आणि ज्ञान निर्मितीचे आश्वासन देण्यात आले आहे. अर्थ व्यवस्थेत बदल करणे, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी मूल्यांचे रक्षण करणे यावर भर दिला आहे.