'हाउस अरेस्ट' नव्हे, 'हाउस रेस्ट' करत आहेत केजरीवाल; भाजपचा पलटवार

By मोरेश्वर येरम | Published: December 8, 2020 05:41 PM2020-12-08T17:41:32+5:302020-12-08T17:42:54+5:30

दिल्लीत 'भारत बंद' पूर्णपणे फोल गेल्याचा दावा आदेश गुप्ता यांनी केला आहे.

Kejriwal is doing house rest not house arrest BJPs counter attack | 'हाउस अरेस्ट' नव्हे, 'हाउस रेस्ट' करत आहेत केजरीवाल; भाजपचा पलटवार

'हाउस अरेस्ट' नव्हे, 'हाउस रेस्ट' करत आहेत केजरीवाल; भाजपचा पलटवार

Next

दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा मुद्दा आता जोरदार गाजत आहे. 'आप'ने दिल्ली पोलिसांवर केलेल्या आरोपांवर आता भाजपने प्रत्त्युतर दिलं आहे. ''केजरीवाल 'हाउस अरेस्ट' नसून 'हाउस रेस्ट' करत आहेत", असा टोला दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी लगावला आहे. 

दिल्लीत 'भारत बंद' पूर्णपणे फोल गेल्याचा दावा आदेश गुप्ता यांनी केला आहे. ते म्हणाले की, "केजरीवालांनी केलेल्या आवाहनाला दिल्लीच्या जनतेने धुडकावून लावलं आहे. त्यामुळे केजरीवाल घरात तोंड लपवून बसले आहेत. ते 'हाउस अरेस्ट' झालेले नसून 'हाउस रेस्ट' करत आहेत"

गेल्या सात महिन्यांपासून केजरीवाल घरातच आहेत. ते बाहेर निघतात तरी कुठे? नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा त्यांचा दावा दिल्ली पोलिसांनी पुराव्यानिशी फेटाळून लावला आहे. सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता त्यांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे असं पोलिसांनी सांगितल्याचंही आदेश गुप्ता म्हणाले.

सिंघू सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेऊन आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरात दिल्ली पोलिसांनी नजरकैद केल्याचा आरोप 'आप'कडून करण्यात आला आहे. 'आप'ने केलेले आरोप दिल्ली पोलीसांच्या उत्तर जिल्हा उपायुक्तांनी फेटाळून लावले आहेत. यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानाबाहेरचा फोटोच ट्विट केला आहे. केजरीवाल यांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर कोणतीही बंधनं नाहीत, असंही दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 
 

Web Title: Kejriwal is doing house rest not house arrest BJPs counter attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.