Kerala Assembly Elections 2021 : सीएएचा मुद्दा केरळ निवडणुकीत ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 05:16 AM2021-03-30T05:16:11+5:302021-03-30T05:17:02+5:30
Kerala Assembly Elections 2021 : केरळमधील निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजप पुरस्कृत एनडीएने आपले वचन पूर्ण करणार असल्याचे सांगितले, तर डाव्या आघाडीने (एलडीएफ) हा कायदा कोणत्याही स्थितीत लागू करणार नसल्याचे सांगितले.
पुतली : केरळमधील निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजप पुरस्कृत एनडीएने आपले वचन पूर्ण करणार असल्याचे सांगितले, तर डाव्या आघाडीने (एलडीएफ) हा कायदा कोणत्याही स्थितीत लागू करणार नसल्याचे सांगितले.
केरळमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला डाव्या पक्षांनी व काँग्रेसने विरोध करीत मोर्चे काढले होते. त्याचवेळी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. हा कायदा भेदभाव करणारा आणि मुस्लीमविरोधी असल्याचे त्यावेळी म्हटले होते.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आपल्या पक्षाने दिलेले वचन पूर्ण केल्याचे सांगितले. कोट्टयम जिल्ह्यातील पुथुपुल्ली मतदारसंघात प्रचारादरम्यान ते म्हणाले, काश्मीरमधून ३७० कलम रद्द करणे, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, मुस्लीम महिलांसाठी तीन तलाक रद्द करण्याचे वचन त्यांनी पूर्ण केले आहे.
कोळीकोड जिल्ह्यातील पुरामेरी मतदारसंघात प्रचारादम्यान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार नाही. उत्तर भारतात अल्पसंख्याकांविरुद्धच्या काही घटनांबद्दल संघ परिवाराविरुद्ध त्यांनी टीका केली. मुस्लीम आणि ख्रिश्चनांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोपही विजयन यांनी केला.
केरळ निवडणुकीत चित्रपट कलाकारांना उमेदवारी
तिरुवनंतपुरम : इतर राज्यांप्रमाणेच केरळमध्येही चित्रपट आणि टीव्ही कलाकारांचे आकर्षण मोठ्या प्रमाणावर असल्याचे सुरू असलेल्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी चित्रपट आणि टीव्ही कलाकारांना तिकिटे दिली आहेत. यावेळी नऊ कलाकारांना विविध राजकीय पक्षांनी निवडणूक रिंगणात उतरविले आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते आणि राज्यसभेचे सदस्य सुरेश गोपी यांना भाजपने त्रिशूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. डाव्या आघाडीने विद्यमान आमदार बी. गणेश कुमार यांना पठाणपूरम मधून तर मुकेश यांना कोल्लम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पाला विधानसभा मतदारसंघातून आमदार एम. सी. कप्पन यांनी डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सोडून ते काँग्रेसप्रणीत यूडीएफकडे गेले आहेत. या जागेवरून ते पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. त्यांना काँग्रेस एम. पक्षाचे उमेदवार जोसेफ के. यांच्याविरुद्ध उमेदवारी देण्यात आली आहे. ते मणी पक्षाचे उमेदवार आहेत.