Kerala Election Result : केरळमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची कमाल, घेतली एवढ्या जागांवर आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:26 PM2021-05-02T13:26:24+5:302021-05-02T13:28:11+5:30
Kerala Assembly Election Result 2021 : केरळमध्ये डाव्या पक्षांच्या एलडीएफ या आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही घवघवीत यश मिळवले आहे.
तिरुवनंतपूरम - केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये डाव्या पक्षांनी जोरदार मुसंडी मारत सत्ता कायम राखली आहे. (Kerala Assembly Election Result 2021 ) दरम्यान, डाव्या पक्षांच्या एलडीएफ या आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही घवघवीत यश मिळवले आहे. राष्ट्रवादी कांग्रेसने केरळमध्ये तीन जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी, दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे.
डाव्या पक्षांसोबत आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने एलाथूर, कुट्टानाद आणि कोट्टाकल या तीन मतदारसंघात उमेदवार दिले होते. त्यातील एलाथूर आणि कुट्टानाद येथे राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर कोट्टाकल मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पिछाडीवर आहे.
एलाथूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ए. के. ससीधरन यांनी आघाडी घेतली आहे. ससीधरन यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत २१ हजार ४६४ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार सुल्पिकार मयुरी यांना ११ हजार ७९२ मते मिळाली आहेत. तर भाजपाचे टी. पी. जयचंद्रन मास्टर यांना ८ हजार १७२ मते मिळाली आहे.
तर कुट्टानाद मतदारसंधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार थॉमस के थॉमस हे २० हजार ७६३ मतांसह आघाडीवर आहेत. तर केरळ काँग्रेसचे जेकब अब्राहम १६ हजार ६७१ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
कोट्टाकल मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीचा उमेदवार पिछाडीवर पडला आहे. येथील राष्ट्रवादीचे उमेदवार एन. ए. मोहम्मद कुट्टी पिछाडीवर आहेत. येथे इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रा. अब्दुल हुसेन थंगल ३६ हजार ४४३ मतांसह आघाडीवर आहेत.