खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश अन् भाजपच्या निष्ठावंतांची घालमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:11 PM2020-10-21T23:11:11+5:302020-10-21T23:15:01+5:30
Eknath Khadse Quit BJP भाजपमधील नाराज राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- राजेश शेगाेकार
अकाेला : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा मुहूर्त अखेर जाहीर झाला अन् खडसे समर्थक असलेल्या भाजपमधील नेते व कार्यकर्त्यांची घालमेल सुरू झाली. ‘पार्टी वुईथ डिफरन्स’, असे एकेकाळी अभिमानाने मिरवणारी भाजप आता बऱ्यापैकी काँग्रेसच्याच वळणावर गेली आहे. एका विशिष्ट गटाच्या व व्यक्तीच्याच हाती सत्ता केंद्रित हाेण्याचे प्रकार दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्टपणे दिसत असल्याने अनेक निष्ठावंतांना पक्षाच्या प्रवाहात डावलले जात आहे. अशा निष्ठावंतांसाठी खडसे यांचे पक्षांतर वेदनादायी ठरत असून, खडसेंचा अकाेल्यातील गाेतावळा पाहता भाजपमधील नाराज राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पश्चिम वऱ्हाडात खडसे यांचा माेठा गाेतावळा आहे. अकाेल्यात त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही अकाेल्यात वास्तव्य असून, भाजपमध्ये सक्रियता आहे. नजीकच्या बुलडाण्यात त्यांचे सासर आहे, त्यामुळे नात्या-गाेत्यासह कार्यकर्त्यांची माेठी फळी एकनाथ खडसे यांची समर्थक आहे. खडसे यांना ज्या प्रकारे भाजपमध्ये एकाकी पाडण्यात आले हाेते, तसा प्रकार अकाेल्यातील भाजपमध्ये अनेक कार्यकर्त्यांसाेबत घडला आहे. खुद्द आजी, माजी राज्यमंत्र्यांच्या गटातील शह-काटशहचे राजकारण पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्याही कानावर गेले आहे, त्यामुळे भाजपमधील नाराजांना खडसेंच्या रूपाने असणारा आधारही आता गेला असल्याने असे कार्यकर्ते खडसेंच्या पाठाेपाठ राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याची शक्यता नाकारता येत नाही. परवाच अकाेल्यातील भाजपच्या पाच माजी पदाधिकाऱ्यांनी जळगाव गाठून खडसे यांची भेट घेतली. हे कार्यकर्ते प्रातिनिधीक स्वरूपात भेटले; मात्र भेटीचा उद्देश व त्यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची भाजपमध्ये हाेत असलेली घुसमट या निमित्ताने उघड झाली आहे.
सध्या अकाेल्याच्या भाजपवर खासदार गटाचे एकहाती वर्चस्व आहे. माजी पालकमंत्र्यांच्या गटाला पूर्वीही खासदार गटाने गृहित धरले नव्हतेच व आता भाजपची सत्ता गेल्यापासून तर या गटाची स्थिती सहनही हाेत नाही अन् सांगताही येत नाही, अशी झाली आहे; त्यामुळे या दाेन्ही गटांपासून डावललेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची घालमेल वाढली असून, खडसे यांना साथ देत त्यांनी राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला तर आश्चर्य वाटायला नकाे, अशी स्थिती आहे.