नायब राज्यपालपदावरून हटवल्यावर किरण बेदी पहिल्यांदाच बोलल्या, मोदी सरकारच्या निर्णयाबाबत म्हणाल्या...
By बाळकृष्ण परब | Published: February 17, 2021 10:27 AM2021-02-17T10:27:27+5:302021-02-17T10:29:39+5:30
Kiran Bedi's reaction on her removal from the post of lt Governor of Puducherry :
पुदुच्चेरी - मुख्यमंत्र्यांसोबत दीर्घकाळापासून असलेले मतभेद आणि गेल्या काही दिवसांत घडलेल्या झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना केंद्र सरकारने काल रात्री तडकाफडकी पदावरून हटवले. दरम्यान, मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर किरण बेदी यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून किरण बेदी यांनी ऑडिओच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले आहे.
किरण बेदी ट्विटरवरील या संदेशात म्हणाल्या की, पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानते. तसेच या काळात ज्यांनी माझ्यासोबत काम केले त्या सर्वांचेही मी आभार मानते.
टीम राजनिवासने या कार्यकाळात जनतेसाठी काम केले. जे काम झाले ते पवित्र कर्तव्य होते. ज्यामध्ये घटनेद्वारे देण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करण्यात आली. पुदुच्चेरीचे भविष्य खूप चांगले आहे. आता ते येथील जनतेच्या हातात आहे.
Thank all those who were a part my journey as Lt Governor of Puducherry—
— Kiran Bedi (@thekiranbedi) February 17, 2021
The People of Puducherry and all the Public officials. 🙏 pic.twitter.com/ckvwJ694qq
मंगळवारी रात्री राष्ट्रपतींनी किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केले होते. तसेच तेलंगणाच्या राज्यपालांकडे पुदुच्चेरीचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. किरण बेदी यांची २०१६ मध्ये पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.
पुदुच्चेरीमध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. मात्र या निवडणुकीपूर्वीी सत्ताधारी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. काँग्रेसच्या चार आमदारांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे.