Mumbra Hospital Fire: 'ही वेळ राजकारणाची नाही'; मुंब्र्यात गेलेल्या किरीट सोमय्यांना शानू पठाण यांनी पिटाळून लावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:28 PM2021-04-28T12:28:28+5:302021-04-28T12:30:04+5:30
Prime Hospital Fire: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. कौसा येथील जळीत कांडानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन महाविकास आघाडीवर टीका केली. त्यावेळी घटनास्थळी मदतकार्य करणारे शानू पठाण हे प्रचंड संतप्त झाले. त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे कोविड रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करणार्या सोमय्या यांना आल्या पावली परतावे लागले.
ठाणे : प्राईम रुग्णालयाच्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी येऊन “ठाकरे सरकारच्या काळात कोविड हत्याकांड सुरु आहे” असे विधान करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी चांगलेच फटकारले. “आम्ही जनतेचे जीव वाचविण्याला महत्व देत आहोत. प्रत्यक्ष मदतीच्या वेळी घरात बसणारे येथे येऊन राजकारण करीत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. ही वेळ राजकारणाची नाही. जगलो तर राजकारण करुच; पण, टीका करण्यापूर्वी हिम्मंत असेल तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून दाखवा, अशा शब्दात शानू पठाण यांनी सोमय्या यांचा समाचार घेतला. (Bjp's Former MP kirit somaiya went at Mumbra's Prime Hospital fire spot, NCP opposed.)
कौसा येथील जळीत कांडानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन महाविकास आघाडीवर टीका केली. त्यावेळी घटनास्थळी मदतकार्य करणारे शानू पठाण हे प्रचंड संतप्त झाले. त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे कोविड रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करणार्या सोमय्या यांना आल्या पावली परतावे लागले.
यावेळी पठाण म्हणाले की, आज दुर्घटनेनंतर राजकारण करण्यासाठी सोमय्या येथे आले आहेत. जेव्हा मुंब्रा-कौसा भागात अनेक लोक मरत होते, तेव्हा हे कुठे होते? रात्री आग लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता आम्ही रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविले ; त्यावेळी सोमय्या कुठे होते. डॉ. जितेंद्र् आव्हाड हे दिवसरात्र काम करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार आम्ही कोरोना रुग्णांना मदत करीत आहोत. आता हे लोक येऊन टीका करीत आहेत. अशी फुकटची टीका आम्ही सहन करणार नाही. हा मुंब्रा आहे, येथे मेहनत करणार्यांची कदर केली जाते. पण, काम करणार्यांवर टीका कराल तर आम्ही ते चालवून घेणार नाही. आज टीका करणार्यांची सत्ता केंद्रात आहे. केंद्र सरकारची जबाबदारी नाही का? ऑक्सिजन पुरवठा करणे, रेमडेसीवीरचा पुरवठा करणे, कोविड लसींचा पुरवठा करणे या बाबतीत हिम्मंत असेल तर केंद्र सरकारला जाब विचारुन दाखवा ना? महाराष्ट्रावर टीका करताना जर स्वत:च्या अंतर्मनातही बघा, आज भाजपची सत्ता असलेल्या गुजरात, मध्यप्रदेशातील मृत्यूदर महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. या कोविड काळात राजकारण बाजूला ठेवण्याची वेळ आहे. मात्र, किरीट सोमय्यांसारखे लोक मृत्युचे राजकारण करीत आहेत. लोकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याऐवजी सर्व संपल्यावर राजकारण करण्यासाठी येतात. त्यांनी आता तरी राजकारण बाजूला ठेवावे. आम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करतो; अन् हे लोक राजकारण करतात; त्यांनी हे ध्यानात ठेवावे की जगलो तर राजकारण करु. आणि हिम्मंत असेल तर केंद्र सरकारला त्यांनी सांगावे अन् महाराष्ट्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात सहभागी व्हावे. महाराष्ट्राची अडवणूक करणार्या केंद्र सरकारला सोमय्यांनी जाब विचारावा, अशा शब्दात सोमय्या यांचा पठाण यांनी समाचार घेतला.