कीर्तिकरांची सायकल रॅली, तर निरुपम यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 01:42 AM2019-04-15T01:42:35+5:302019-04-15T01:42:58+5:30
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी गोरेगाव पूर्व येथे सायकल रॅलीचे आयोजन केले होते.
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी गोरेगाव पूर्व येथे सायकल रॅलीचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे, आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनी गाठीभेटींवर आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत रविवारी प्रचार केला.
युतीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी गेल्या रविवारीही देसाई यांनी गोरेगाव पश्चिम भागात कीर्तिकर यांच्या सुमारे तीन तास सायकल रॅली काढली होती. वाळकेश्वर येथील सरकारी पुरातन बंगल्यात ते रोज ५ किमी रायकल फेरी पूर्ण करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. सायकल रॅलीत भाजपचे जयप्रकाश ठाकूर, महिला विभाग संघटक व नगरसेविका साधना माने, नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर आदी सामील झाले होते. गजानन कीर्तिकर यांनी अंधेरी पश्चिम परिसरातील प्रचार रथफेरी दरम्यान आझादनगर येथील एका कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रचार रथ फेरीचा प्रारंभ शाखा क्रमांक ६६ येथून झाला आणि आझादनगर येथे समाप्ती झाली. प्रचार रथफेरीच्या दरम्यान भाजपचे आमदार अमित साटम, शिवसेना पदाधिकारी वीणा टॉक, प्रसाद आयरे, संजय पवार, शरद जाधव, हारून खान व महायुतीचे कार्यकर्ते सामील झाले होते. काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी रविवारचा दिवस गाठीभेटींवर आणि कार्यकर्त्यांशी संवादावर घालविला. सोमवारी सकाळपासून ते पुन्हा परत जोराने प्रचाराला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, हे सगळे सुरू असतानाच निरुपम मतदारांशी संवाद साधत असून, कार्यकर्त्यांच्या गाठभेटीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करत आहेत.