जानकर यांना पुन्हा बळ मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 06:07 AM2019-01-25T06:07:52+5:302019-01-25T06:08:17+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला.

Knowing that he will get the strength? | जानकर यांना पुन्हा बळ मिळणार का?

जानकर यांना पुन्हा बळ मिळणार का?

Next

- अविनाश थोरात
बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला. मात्र, गेल्या वेळी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच दमणूक झाली. धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी निसटत्या मतांनी विजय मिळविला. यंदाही पुन्हा सुळे- जानकर अशीच लढत होणार आहे. परंतु, जानकर यांना समाजाचे आणि पक्षाचे बळ मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.
२००९ च्या निवडणुकीत सुळे देशात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन विजयी झाल्या होत्या. परंतु, २०१४ मध्ये त्यांचे मताधिक्य लाखांच्या आत आले. जानकर यांनी कपबशीऐवजी कमळ चिन्ह घेतले असते तर निकाल वेगळा लागला असता असेही बोलले जात होते. यंदाही पुन्हा जानकरच लढणार आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट होतीच. त्याचबरोबर धनगर आरक्षण, ऊसाचा प्रश्न यांनी जानकर, राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्याविरुध्द रान उठविले होते. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. भाजपाकडून या समाजाला आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले होत. सत्तेची चार वर्षे उलटून गेली तरी आरक्षण प्रत्यक्षात आले नाही. राज्याच्या मंत्रीमंडळात जानकर यांना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रीपद मिळाले. मात्र, गेल्या चार वर्षांत त्यांनी बारामतीकडे ढुंकूनही पाहिले नाही, असा त्यांच्याच कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे २०१४ पर्यंत जानकर यांच्यासोबत असलेले अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून गेले आहेत.
गेल्या वेळी बसलेल्या झटक्यामुळे मतदारांना गृहित धरता येणार नाही, याची जाणीव सुळे यांना झाली आहे. खासदारकीच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे.
बारामतीतील सहा विधानसभा मतदारसंघापैकी बारामती आणि इंदापूर या दोनच ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पुरंदरमध्ये शिवसेना, दौंडमध्ये राष्टÑीय समाज पक्ष, खडकवासला-भाजपा आणि भोरमध्ये कॉँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या वेळी इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना पाठिंंबा दिला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा राष्टÑवादीने पराभव केला. इंदापूरच्या जागेचा प्रश्न राहणार असल्याने पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
गेल्या वेळी जानकर यांच्याबाबत प्रचंड सहानुभूती होती. त्याला मोदी लाटेची जोड मिळाली. मतदानाच्या आकडेवारीवरून राष्टÑवादीचा बारामतीतही पराभव करता येऊ शकतो, याचा विश्वास विरोधकांना आला. यंदा अशी हवा जानकर आणि पर्यायाने भाजपाला करता आली तरच निवडणूक चुरशीची होईल.
>सध्याची परिस्थिती
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील बूथ कमिटी कार्यकर्त्यांशी नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला. महादेव जानकर यांनी कपबशीच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. रासपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा कॉँग्रेसला देण्याच्या बदल्यातच सुळे यांना पाठिंबा देण्याची अट हर्षवर्धन पाटील घालू शकतात. यामुळे राष्टÑवादीत अस्वस्थता आहे. धनगर समाजाचे आरक्षण हा कळीचा मुद्दा बनणार आहे. यावरून जानकर यांना घेरण्याची तयारी राष्टÑवादीने सुरू केली आहे.

Web Title: Knowing that he will get the strength?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.