Konkan Flood: "इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल’’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 01:04 PM2021-07-24T13:04:07+5:302021-07-24T13:05:21+5:30
Uddhav Thackeray News: दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेल्या तळीये गावाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रवाना झाले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने खोचक टीका केली आहे.
मुंबई - मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात ४० हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. या गावात अद्यापही बचावकार्य सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर तळीये गावाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रवाना झाले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने खोचक टीका केली आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Says, "Maharashtra has never had such a fast Chief Minister in the history of the country")
उद्धव ठाकरेंच्या महाड दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या या धावत्या दौऱ्यावर टीका केली आहे. इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर लगावला आहे.
इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल... pic.twitter.com/LR0PZNgAtp
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 24, 2021
मुख्यमंत्री ठाकरे घटनास्थळावर तळीये गावातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तसेच घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. आज दुपारी मुंबईहून मुख्यमंत्री रवाना झाले असून, ते हेलिकॉप्टरनं महाडच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचतील. त्यानंतर तिथून रस्तेमार्गे दुपारी दीडच्या सुमारास तळीये गावात पोहोचणार आहेत. त्यानंतर दुपारी ३.२० वाजता मुख्यमंत्री मुंबईकडे परत रवाना होतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातून देण्यात आली आहे.
दरम्यान, डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना मुख्यंमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, राज्यात जिथे जिथे डोंगर उतारावर आणि डोंगराखाली वस्त्या आहेत. त्यांना आम्ही स्थलांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे. कारण रस्ते खचत आहेत. काही ठिकाणी पूल गेलेले आहे. अशा ठिकाणी जे नागरिक राहत आहेत, तेथे राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावं. जिथे धोका निर्माण होऊ शकतो. तिथून नागरिकांना स्थलांतरीत केलं जाईल. पावसाचा अंदाज वर्तवता येतो, पण ढगफुटीचा अंदाज व्यक्त करता येत नाही. तसेच दरड कुठे कोसळेल याचाही अंदाज वर्तवता येणार नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते.