"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 03:53 PM2024-10-02T15:53:01+5:302024-10-02T15:54:30+5:30
Laxman Hake Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, जरांगे निवडणूक लढवणार नाहीत, ते पाच उमेदवार देऊ शकत नाही, असे लक्ष्मण हाके म्हटले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी २८८ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी जरांगेंनी घोंगडी बैठकाही सुरू केल्या आहेत. पण, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी वेगळाच दावा केला आहे. मनोज जरांगेंकडे पाच उमेदवारही देऊ शकत नाही, असे हाके यांनी म्हटले आहे.
लक्ष्मण हाके राज्यभर फिरत आहेत. सोलापूर येथे असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे निवडणूक लढवणार नाहीत, असे भाकित केले.
लक्ष्मण हाके म्हणाले, "इथल्या पुढाऱ्यांनी फक्त निवडणुका जिंकण्याचे व्याकरण आत्मसात केले. निवडणुका जिंकण्याचे तंत्र या लोकांकडे आहे. पण, महाराष्ट्रातील ओबीसींचे अंतकरण समजून घेण्याचे काम, मग शरद पवार असो, पृथ्वीराज चव्हाण असो, अशोकराव चव्हाण... २९ मुख्यमंत्र्यांपैकी २१ मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. या सगळ्या मराठा समाजाच्या नेत्यांनी परत परत सत्तेवर कब्जा केला.
जरांगे पाच उमेदवारही उभे करणार नाही -हाके
"जरांगेंनी २८८ उमेदवार उभे करावेत. जरांगे पाच उमेदवार पण उभे करणार नाही. जरांगेंना उमेदवार जाहीर करायचे असतील, तर त्यांनी ज्या घनसावंगी तालुक्यात आंदोलन झाले, तिथलाच पहिला उमेदवार त्यांनी जाहीर करावा. जरांगे असे काही करणार नाहीत", असे भाष्य लक्ष्मण हाके यांनी केले.
"जरांगे शरद पवारांच्या स्क्रिप्टवर काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जरांगेंचे राजकीय व्हिजन आहे, ना पक्ष आहे. २८८ जागा खूप मोठी गोष्ट आहे. निवडणुका या एका जातीच्या प्रश्नावर लढवल्या जातात का? जातीय अस्मितेवर लढवल्या जातात की, आम्ही ९६ कुळी, आम्ही ९२ कुळी, असे म्हणून निवडणुका लढवल्या जातात का? जरांगे निवडणूक लढवणार हे शक्यच नाही", असे दावा हाकेंनी केला.