"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 08:09 PM2024-10-15T20:09:09+5:302024-10-15T20:09:50+5:30

Laxman Hake Manoj Jarange Maharashtra Vidhan Sabha election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे, तर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी जरांगेंविरोधात दंड थोपटले आहेत. 

Laxman Hake has said that OBC voters will vote against the candidates supported by Manoj Jarange in the maharashtra assembly elections | "मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?

"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?

Maharashtra Assembly 2024 Laxman Hake News: लोकसभा निवडणुकीपासून तीव्र झालेला आरक्षण संघर्ष विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी तापला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने मागण्यांवर निर्णय घ्यावा, असे जरांगे म्हणाले होते. ते न झाल्याने जरांगेंनी आता महायुतीला सुपडा साफ करून, असे आव्हान दिले आहे. जरांगेंच्या आव्हानानंतर लक्ष्मण हाकेंनीही बाह्या वर खोचल्या असून, मनोज जरांगे ज्याला पाठिंबा देतील, त्याच्याविरोधात ओबीसी असतील, असे म्हणत उमेदवारांची चिंता वाढवली आहे. (Manoj Jarange vs Laxman Hake)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, "या विधासभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील तमाम ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या लोकांना आमचं आवाहन असेल की, जे जे आमदार, जे जे पक्ष आणि ज्या ज्या पक्षाचे प्रमुख ओबीसींच्या बाजूने मग कायद्याच्या सभागृहात असो वा रस्त्यावर असो, ज्यांनी ज्यांनी ओबीसींच्या आरक्षणाबद्दल, हक्कांबद्दल भूमिका घेतली नाही. त्या लोकांना पराभूत करणे आणि त्या माणसांना विधानसभेत जाण्यापासून रोखणं, या दृष्टिकोणातून आम्ही ओबीसी बांधव महाराष्ट्रात काम करणार आहोत." 

लक्ष्मण हाकेंनी कोणाला दिला इशारा?

"ज्या आमदारांनी जरांगेंचा पाठिंबा घेतला. जरांगेंनी ज्या ज्या आमदारांना पाठिंबा दिला. त्या त्या ठिकाणी ओबीसी बांधव त्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करतील. महाराष्ट्रात आजपर्यंत पक्षीय राजकारणच झालं आहे. पक्षीय राजकारणात ओबीसींना स्थानच नाही", असे ते म्हणाले. 

"ओबीसींच्या लोकांना विधानसभेची अथवा लोकसभेची तिकिटंच भेटत नाही. तुम्ही सगळ्या यादीवर नजर फिरवा. असा असमतोल महाराष्ट्रात असेल, तर तो महाराष्ट्र पुरोगामी कसला? शरद पवार असो, अशोकराव चव्हाण किंवा एकनाथ शिंदे... या महाराष्ट्रातील ओबीसींचा वापर फक्त मतांसाठी झाला आहे", असे लक्ष्मण हाके म्हणाले.

"आम्ही ओबीसींच्या बाजूने असू. आम्ही सत्ताधारी पक्षांना आवाहन करतो की, आम्ही सांगू त्या लोकांना उमेदवारी द्या. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची. ओबीसींना उमेदवारी देणार नसाल, तर त्या पक्षांना ओबीसी मतदान करणार नाहीत", अशी भूमिका लक्ष्मण हाकेंनी मांडली. 

"लक्ष्मण हाके या प्रवर्गाची भाषा बोलतोय. आम्ही एका जातीची भाषा बोलत नाही. आम्ही ओबीसी म्हणतो. काही लोक जातीची लढाई लढतात. आम्ही ९६ कुळी म्हणतात. आम्ही ९२ कुळी म्हणतात. आम्ही छत्रिय म्हणतात. आम्ही बघून घेऊ म्हणतात. 

मनोज जरांगेंविरोधात हाके आक्रमक

"जिथे जिथे मनोज जरांगे सभेला जातील आणि ज्या ज्या उमेदवारांना जरांगे उमेदवारांना पाठिंबा देतील, ज्या ज्या पक्षांना जरांगे पाठिंबा देतील, त्याच्या विरोधात ओबीसी असतील. कोणाला पराभूत करायचं याची आमच्याकडे यादी तयार आहे. कोणाला पाठिंबा द्यायचा, हे उमेदवार जाहीर झाल्यावर स्पष्ट करू. जिथे ओबीसीचा उमेदवार नसेल, तिथे आम्ही गावातील होतकरू, हुशार मुलांना पाठिंबा देऊ", असे लक्ष्मण हाके म्हणाले. 

Web Title: Laxman Hake has said that OBC voters will vote against the candidates supported by Manoj Jarange in the maharashtra assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.