Eknath Khadse: अखेर एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; शरद पवारांचा भाजपाला मोठा धक्का
By प्रविण मरगळे | Published: October 23, 2020 03:30 PM2020-10-23T15:30:03+5:302020-10-23T16:04:49+5:30
Eknath Khadse join NCP News: भाजपाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंचा प्रवेश झाला.
मुंबई – भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्रात कधीही सुडाचं राजकारण बघितलं नाही – जयंत पाटील
कार्यकर्ते इतक्या मोठ्या संख्येने आले आहेत त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगचं पालन कुठेतरी कमी पडलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मागील ४-५ वर्षात असा बदल झाला की पहिल्या रांगेत बसणाऱ्या नेत्याला मागच्या रांगेत बसावं लागलं असं राजकारण झालं, एकनाथ खडसेंवर जो अन्याय झाला त्यावर सगळ्यात जास्त मीच बोललो असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सुडाचं राजकारण कधीही ऐकलं नव्हतं. विरोधी पक्षात असला तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यायचो. राज्यात सुसंस्कृत राजकारण करायचं हे यशवंतराव चव्हाणांनी शिकवलं, पण मागच्या कालखंडात कुठेतरी राज्यातलं राजकारण बदललं, लोकसभा निवडणुकीत मोठा फटका राष्ट्रवादीला बसला, विधानसभा निवडणुकीवेळी भलेभले नेते, ज्यांच्यावर शरद पवारांनी विश्वास ठेवला ती माणसं आम्हाला सोडून दिली. मात्र राज्याच्या राजकारणात शरद पवारांचे विचारच जनता स्वीकारेल हा ठाम विश्वास आम्हाला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या अनेक घटना सगळ्यांसमोर आहे. वयाच्या ७९ व्या वर्षीही शरद पवार राज्यभर फिरले, तरुण कार्यकर्ते खवळून उठला होता. शरद पवारांना सुडबुद्धीने ईडीची नोटीस पाठवली, त्यातून आताच्या सरकारचा पाया रचला गेला असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आमच्या सरकारनं १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हीच आमची भूमिका आहे. मात्र अलीकडे केंद्राने कृषी क्षेत्राबद्दल जे कायदे केले, त्याबाबत स्पष्टता नाही, कामगार कायद्यात दुरुस्ती केली, ३०० पेक्षा कमी कामगार असले तर त्यांना कधीही काढले जाऊ शकते. उद्योगधार्जिणे केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने विरोध करेल. यासगळ्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम उभं करणं आमचं काम आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करणारा पक्ष राष्ट्रवादी आहे. आमचा पक्ष लहान होता, पण हळूहळू शरद पवारांच्या नेतृत्वामुळे आणि स्वभावामुळे पक्षाची ताकद वाढली. राज्यात, देशात कुठेही संकट आलं तर जनता शरद पवारांकडे अपेक्षेने बघते. शरद पवारांच्या जीवावर आम्ही देशात आणि राज्यात राजकारण करतो, तरुणांना जास्त संधी शरद पवारांनी दिली आहे. नव्या कार्यकर्त्यांची फौज महाराष्ट्रात शरद पवारांनी उभी केली. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात काळात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी फक्त जळगाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात एकनाथ खडसे काम करतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ५-६ आमदार निवडून येतील याचा विश्वास
गेल्या ४० वर्षापासून एकनाथ खडसेंनी अनेकांना न्याय मिळवून दिला. विकासाची दृष्टी असणारे, प्रशासनावर वचक असणारा नेता राष्ट्रवादी आले त्याचा आनंद आहे. एकनाथ खडसेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळेल. जळगाव जिल्ह्यातून किमान ५-६ आमदार एकनाथ खडसेंमुळे निवडून येईल असा विश्वास माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराथी यांनी व्यक्त केला.
एकनाथ खडसेंसोबत या नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
एकनाथ खडसे यांच्या सोबत नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर, बोदवडचे कृउबा सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदा खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी,औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Maharashtra: Eknath Khadse joins NCP (Nationalist Congress Party), in presence of party chief Sharad Pawar in Mumbai. pic.twitter.com/43aKjIpCmW
— ANI (@ANI) October 23, 2020
मुहूर्त लांबला, शरद पवारांची जितेंद्र आव्हाडांसोबत खलबतं
एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे खडसेंना राष्ट्रवादीत योग्य सन्मान देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. एकनाथ खडसेंचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात खलबतं झाल्याची माहिती आहे. वाय. बी सेंटर येथे दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ४५ मिनिटाहून अधिक वेळ चर्चा सुरु होती. जितेंद्र आव्हाडांचे गृहनिर्माण पद एकनाथ खडसेंना देण्यासाठी आव्हाडांची समजूत काढण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला असावा असं राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र पवार-आव्हाड चर्चेमुळे एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त लांबल्याचं बोललं जात होतं.
एकनाथ खडसेंच्या येण्याने आम्हाला बळ मिळेल – आमदार अनिल पाटील
२० वर्ष मी भाजपामध्ये असताना नाथाभाऊंसोबत होतो, भाजपानं कसा त्रास दिला आम्हाला माहितीये, जळगाव जिल्ह्यातील एकही जागा भाजपाला मिळणार असा विश्वास आहे. खासदार, आमदार यांनी आता लगेच राष्ट्रवादीत प्रवेश करावा ही अपेक्षा नाही, कारण निवडणुका घेणे अवघड असतं, त्यामुळे आगामी काळात हे सगळे नेते हळूहळू प्रवेश करतील, एकनाथ खडसेंच्या येण्याने आम्हाला बळ मिळालं आहे. असा दावा अमळनेरचे राष्ट्रवादी आमदार अनिल पाटील यांनी केला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादी कार्यालयाच्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. काही निवडक लोकांनाचा कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला होती, त्यामुळे कार्यालयाबाहेर मोठी स्क्रीन कार्यकर्त्यांसाठी लावण्यात आली होती. तर तब्येतीच्या कारणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला गैरहजर राहिले होते.
एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास कसा होता?
१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.
१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. (Eknath Khadse Political Career)
२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला.
विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी
एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.
खडसेंचा वापर राज्यासाठी करावा, भाजपासाठी नव्हे – भाजपा
एकनाथ खडसेंच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करावा, विकासकामे करण्यासाठी करावा, विरोधकांसाठी नव्हे. एकनाथ खडसेंच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होईल ती भरून काढण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते सक्षम आहेत, उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी होणार नाही असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केला आहे.