४ वेळा पराभूत झालेला नेता ते अण्णाद्रमुकचा प्रमुख चेहरा; मुख्यमंत्री ई पलानीस्वामींचा खडतर प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 05:02 AM2021-03-26T05:02:59+5:302021-03-26T05:03:38+5:30
माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ओ. पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, त्यांना त्या पदावर फार काळ संधी मिळाली नाही. त्यांच्याजागी सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळणाऱ्या पलानीस्वामी यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली.
असिफ कुरणे
चेन्नई : अण्णाद्रमुक पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले आणि ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत दोन वेळा लोकसभा आणि दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री ईडाप्पडी पलानीस्वामी (ईपीएस) आज अण्णाद्रमुक पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून जनतेसमोर जात आहेत. पक्षाच्या हायकमांडमध्ये कधीच चर्चेत नसलेले पलानीस्वामी आज पक्षाचे सर्वेसर्वा बनले आहेत.
माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ओ. पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, त्यांना त्या पदावर फार काळ संधी मिळाली नाही. त्यांच्याजागी सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळणाऱ्या पलानीस्वामी यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली. शशिकला यांना झालेला तुरुंगवास, टीटीव्ही दिनकरन् यांचे बंड आणि राज्यातील विपरीत परिस्थितीत देखील त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. सेलम जिल्ह्यातील गुळाचे व्यापारी, शेतकरी असलेले पलानीस्वामी यांना बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण करता आले नाही. १९७४ मध्ये त्यांनी अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश केला. १९८९ मध्ये ईडाप्पडी मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला. १९९१ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला. मात्र, १९९६ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १९९८ मध्ये ईपीएस यांनी त्रिचेंगोडू लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला; पण १९९९, २००४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २००६ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील त्यांना पराभव पत्करावा लागला; पण ईपीएस यांनी पाच वर्षे आपल्या मतदारसंघात जोरदार काम केले आणि २०११ मध्ये विजय मिळविला.
जयललिता यांचे कट्टर समर्थक
एम. जी. रामकृष्णन् यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्ष दोन गटांत विभागला गेला होता. एक एमजीआर यांची पत्नी व्ही. एम. जानकी गट, तर दुसरा जयललिता यांचा गट. पलानीस्वामी यांनी जयललिता यांची पाठराखण केली. त्यावेळेपासून ते जयललिता यांचे विश्वासू बनले होते. २०११ मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर सेलम जिल्ह्यात त्यांचा दबदबा वाढला. २०१६ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील ११ पैकी १० जागा त्यांनी अण्णाद्रमुकच्या खात्यात घेतल्या होत्या. तामिळ राजकारणात प्रभाव असलेल्या गोंडूर जमातीत त्यांचे प्राबल्य वाढले होते.