मोठा गौप्यस्फोट! “प्रताप सरनाईकांच्या पत्राची लिंक नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेटीत; शिवसेनेत दोन गट”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 05:10 PM2021-06-21T17:10:58+5:302021-06-21T17:14:09+5:30
या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट भाजपाच्या केद्रीय नेत्यांवर टीका केलेली नाही त्यांची देहबोली बदलली आहे असा दावा अंजली दमानिया यांनी केला.
मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर राज्यातील राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. सरनाईक यांनी भाजपाशी जुळवून घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रात केली आहे. मात्र प्रताप सरनाईक यांच्या पत्राची लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीत भेटीत आहे असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, सध्याच्या डिजिटल युगात पत्र लिहितं का? व्हॉट्सअप, फोन, मेसेज करतो. पण हे शिवसेना आमदाराकडूनच असं पत्र लिहिलं गेले. त्यानंतर ते मीडियात आलं हे सगळं हास्यास्पद आहे. या पत्रात दोन मुद्दे असे आहेत ज्यात एकीकडे महाविकास आघाडीत शिवसेनेचा छळ केला जातोय म्हटलं जातं तर दुसरीकडे शिवसेना-भाजपा युतीतील नेत्यांचे संबंध तुटले नाहीत. ते तुटण्याआधी जुळवून घ्यावं. हे सगळं मोदी-ठाकरे भेटीनंतर घडलं आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट भाजपाच्या केद्रीय नेत्यांवर टीका केलेली नाही त्यांची देहबोली बदलली आहे असा दावा त्यांनी केला. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
इतकचं नाही तर शिवसेनेत सध्या दोन गट तयार झाले आहेत. एक मिलिंद नार्वेकरांचा तर दुसरा गट संजय राऊतांचा आहे. संजय राऊतांना शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहावं असं वाटतं तर नार्वेकरांना शिवसेनेने भाजपासोबत जावं असं वाटतं आहे. कोणतीही विचारधारा आणि तत्व नाहीत. केवळ पैसा एकमेव कारण आहे असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. प्रताप सरनाईक यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे ते तपासातून बाहेर पडू शकत नाहीत. मात्र राजकारण पाहता शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत असं दमानियांनी म्हटलं आहे.
प्रताप सरनाईकांच्या पत्रात काय?
आजच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. 'पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल,' असं सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.
सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. 'तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत,' असा खळबळजनक दावा त्यांनी पत्रात केला आहे.
काँग्रेस- राष्ट्रवादीही लक्ष्य
आपली, आपल्या पक्षाच्या आमदारांची व्यथा मांडताना सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला अकारण लक्ष केल्याची भावना शिवसैनिकांत आहे. या दोन्ही पक्षांसोबत महाआघाडी स्थापन केल्यानंतर आणि त्यापूर्वीही शिवसेनेची राजकीय स्पर्धा फक्त भाजपशी असताना या दोन पक्षांना लक्ष्य करून आघाडीत तेढ वाढवण्याची भूमिका नेमकी त्यांची आहे, की त्यामागे कोणी बोलविता धनी आहे याबाबत वेगवेगळे तर्क दिवसभर लढविले जात होते.