LMOTY 2020: फडणवीसांना गृह खात्यातील महत्त्वाची माहिती कुठून मिळाली?; देशमुखांनी सांगितला 'सोर्स'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 04:57 PM2021-03-18T16:57:46+5:302021-03-18T16:58:38+5:30
LMOTY 2020: देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणात सरकारवर पुराव्यासह आरोप केले. त्यामुळे सरकार अडचणीत आलं.
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत सापडलेली कार, त्यानंतर कारमालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू, या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंची वादग्रस्त भूमिका यावरून विधानसभेचं अर्थसंकल्पी अधिवेशन गाजलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम सभागृहात सांगितला. त्यावरून गृह मंत्रालयातील इतकी इत्यंभूत आणि महत्त्वाची माहिती फडणवीस यांना कशी मिळते, असा प्रश्न अनेकांना पडला. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड २०२० सोहळ्यात (Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020) या प्रश्नाचं उत्तर दिलं.
अनेक भाजप नेते मला खासगीत सांगतात...; देशमुखांनी सांगितली 'अंदर की बात'
स्फोटक प्रकरण, त्याचा तपास, गाडीचे चालक हिरेन यांचा मृत्यू यावरून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. फडणवीसांनी पुराव्यासह आरोप केल्यानं ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. फडणवीसांना या प्रकरणातील महत्त्वाची माहिती नेमकी कुठून मिळाली, असा प्रश्न देशमुखांना विचारण्यात आला. त्यावर विरोधी पक्षनेत्यांना स्वत:कडे माहिती ठेवावी लागते. ते इथून तिथून माहिती घेत असतात, असं देशमुख यांनी सांगितलं.
'त्या' चुका गंभीर, माफ करण्यालायक नाहीत; गृहमंत्र्यांनी सांगितलं पोलीस आयुक्तांच्या बदलीमागचं कारण
देवेंद्र फडणवीस यांना गृह खात्यामधील अतिशय महत्त्वाची माहिती नेमकी कुठून मिळाली, याचं नेमकं उत्तरदेखील देशमुख यांनी पुढे दिलं. गटबाजी केवळ राजकीय पक्षांमध्ये नसते. सगळीकडेच गटबाजी असते. पोलीस दलदेखील त्याला अपवाद नाही. आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही गटतट असतात. त्यातूनच महत्त्वाची माहिती बाहेर जाते, असं गृहमंत्री देशमुख म्हणाले.
एपीआय दर्जाच्या वाझेंना तपास का दिला?
मुंबई पोलीस दलाची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. त्यांची तुलना स्कॉटलँड यार्डशी होते. पण काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृत्यांचा फटका संपूर्ण पोलीस दलाला बसतो, अशा शब्दांत देशमुख यांनी अँटिलिया प्रकरणावर भाष्य केलं. इतक्या गंभीर आणि महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास एपीआय पदावरील वाझेंकडे का सोपवला, या प्रश्नालादेखील गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं. सुरुवातीला सीआययूकडे तपास दिला गेला. वाझे या विभागाचे प्रमुख होते. पण तीन दिवसांतच या घटनेचं गांभीर्य लक्षात आलं. त्यानंतर तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवला गेला, असं देशमुख यांनी सांगितलं.