LMOTY 2020: अनेक भाजप नेते मला खासगीत सांगतात...; देशमुखांनी सांगितली 'अंदर की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 04:08 PM2021-03-18T16:08:24+5:302021-03-19T10:38:34+5:30
LMOTY 2020: भाजपकडून देण्यात येणाऱ्या सरकार पडण्याच्या डेडलाईनला देशमुख यांच्याकडून प्रत्युत्तर
मुंबई: महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी होत आला आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पक्षानं सरकार पडण्याच्या डेडलाईन दिल्या. मात्र अद्याप तरी सरकारला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेरोशायरी सादर करताना राज्यात ३ महिन्यांत सत्तापरिवर्तन होईल, असं अप्रत्यक्षपणे सुचवलं. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. विदर्भाच्या दोन नेत्यांमधला कलगीतुरा यानिमित्तानं पाहायला मिळाला.
“शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं; २ मे नंतर महाराष्ट्रात सत्तेचा प्रलय नक्कीच होईल”
सुधीर मुनगंटीवार यांनी 'तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा' असं सूचक विधान विधिमंडळात केलं होतं. त्यावर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड २०२० सोहळ्यात (Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020) भाष्य केलं. राज्यात महाविकास आघाडी सरकारचं सत्तेत आल्यापासून सरकार पडण्याच्या डेडलाईन दिल्या जात आहेत. पण सरकारला कोणताही धोका नाही. आमचं सरकार स्थिर आहे, असा ठाम विश्वास देशमुखांनी व्यक्त केला.
तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या वाक्यानं कान टवकारले, भुवया उंचावल्या
सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसावं लागेल याचा विचार भाजपच्या नेत्यांनी कधीही केला नव्हता. त्यांना सत्तेची स्वप्नं पडत आहेत. पण मुंगेरीलाल के हसीन सपने पाहणं त्यांनी बंद करावं. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात सत्ताबदल होईल अशी आस त्यांना लागली आहे. पण तसं काहीही घडणार नाही. आमचे आमदार पळून जाऊ नये म्हणूनच आम्हाला महाविकास आघाडी सरकार पडेल. आपली सत्ता येईल, असे दावे करावे लागतात, असं भाजप नेते आम्हाला खासगीत सांगत असतात, असं देशमुख यांनी सांगितलं.