Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:02 PM2024-10-17T22:02:58+5:302024-10-17T22:04:28+5:30

BJP Shiv Sena Seat conflict: एकनाथ शिंदे यांनी आशिष जयस्वाल यांची रामटेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. त्याला भाजपामधून विरोध होत आहे. माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांची हकालपट्टी केल्यानंतर आता भाजपा नेत्यांनी राजीनामे दिले. 

Local BJP leaders oppose the candidature of Shiv Sena candidate Ashish Jaiswal | Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"

Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"

जितेंद्र ढवळे, नागपूर 
Ramtek Vidhan Sabha election 2024: २०१९ मध्ये अपक्ष निवडून आलेल्या आशिष जयस्वाल यांना शिवसेनेत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीही जाहीर करून टाकली. भाजपामधून याला विरोध होऊ लागला आहे. रामटेक मतदार संघात आमदार आशिष जयस्वाल वगळता महायुतीने दुसरा उमेदवार जाहीर करावा. भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते निष्ठेने काम करतील. तसेच रेड्डी यांचे निलंबन रद्द करण्याबाबत पक्षाने फेरविचार करावा, अशी मागणी गुरुवारी करण्यात आली. 

आमदार आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर भाजपने माजी आमदार डी. एम. रेड्डी यांची दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रामटेक येथील गंगाभवन येथे भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

भाजपाच्या ५१२ पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

या मेळाव्यात ५१२ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राजीनामे दिल्याची माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकरे यांनी दिली. बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडलेली भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचविली जाईल, असेही ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

रामटेक विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदला

या मेळाव्याला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रेड्डी यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याच्या भावना व्यक्त केल्या. "रामटेकमध्ये युतीचा उमेदवार बदलावा, अशी भूमिका आपण पक्षातील नेत्यांनी सांगितली होती", अशी माहिती रेड्डी यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली.

माजी आमदार रेड्डी काय म्हणाले?

"२०१९ मध्ये युतीचा धर्म न पाळणाऱ्या व भाजप कार्यकर्त्यांची गळचेपी करणाऱ्या उमेदवाराला परत युतीची उमेदवारी जाहीर झाली. हे कार्यकर्त्यांना पचनी पडले नाही. आम्ही पक्षवाढीसाठी प्रयत्न करतो; पण आमच्या भावना लक्षात न घेता उमेदवारी जाहीर करणे अयोग्य आहे. मला निलंबित करण्यात अगोदर स्पष्टीकरण मागणे आवश्यक होते. पण घाईघाईने पत्र निघाले. या संदर्भात रेड्डी यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा व गृहमंत्री अमित शाह यांना यांनी सविस्तर निवेदन पाठविले आहे", अशी माहिती रेड्डींनी दिली. 

या मेळाव्यात निवडणूक लढविण्याबद्दल कोणतीही भूमिका रेड्डी यांनी जाहीर केली नाही. कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे भूमिका जाहीर करू असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Local BJP leaders oppose the candidature of Shiv Sena candidate Ashish Jaiswal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.