'मोदींची चौकशी करा, गांजा तर ओढत नाहीत ना?'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 07:15 AM2019-03-29T07:15:17+5:302019-03-29T07:16:48+5:30
मोदींच्या 'शराब' विधानावर आपची जोरदार टीका
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या 'शराब' या टिप्पणीवर पलटवार करताना संजय सिंह म्हणाले की, 'मोदींची चौकशी करा. ते गांजा तर ओढत नाहीत ना? राजकीय पक्षांना शराब, हेरॉईन आणि कोकेन असे तर चौकातील टपोरी नेता बोलू शकतो, पंतप्रधान नाही.' संजय सिंह यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी काल उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या भाषणावर संजय सिंह यांनी जोरदार टीका केली. मोदींनी तुम्हाला फसवलं. ते इतकं खोटं बोलले की तुम्हीसुद्धा यामध्ये अडकलात, असं संजय सिंह यांनी म्हटलं. सर्वकाही वाईट घडून गेल्यानंतरही मोदी भाजपाला मतदान करा सांगतात, असं म्हणत त्यांनी शोले चित्रपटातील एक प्रसंग सांगितला. 'आम्ही एक सिनेमा पाहिला होता, शोले. त्यामध्ये अमिताभ धर्मेंद्रसाठी बसंतीला मागणी घालण्यासाठी मावशीकडे जातात आणि म्हणतात, धरेंद्र व्यसनी आहे, जुगारी आहे. मात्र हे स्थळ नक्की करा. लग्नाला होकार द्या,' असं संजय सिंह म्हणाले.
मोदी जी की जाँच कराओ कहीं गाँजा तो नही पीते? राजनीतिक दलों को शराब अफ़ीम हीरोइन कोकीन तो कोई चौराहे छाप नेता बोल सकता है प्रधानमंत्री नही। https://t.co/EoUfdAW0ey
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) March 28, 2019
संजय सिंह यांनी पुढे बोलताना मोदी आणि धर्मेंद्र यांच्या साम्य असल्याचं सांगितलं. 'आपले मोदी दिवस-रात्र खोटं बोलतील. तुम्हाला फसवण्याचं काम करतील. तुमचे खिसे कापतील. महागाई वाढवण्याची घोषणा करतील. पेट्रोल 90 रुपयांनी तर डिझेल 85 रुपयांनी विकतील. दिल्लीत माता-भगिनींना सुरक्षा देणार नाहीत. 15 लाखांच्या नावाखाली खोटी आश्वासनं देण्याचे काम करतील. मात्र, निवडणुका आल्या तर पहिल्यांदा मतदान भाजपाला देण्याची मागणी करतील. त्यामुळे शोलेतील धमेंद्रपासून यावेळी सावध राहा. आपले मोदी शोलेचे धमेंद्र आहेत,' असा टोला त्यांनी लगावला.
मेरठमध्ये काल झालेल्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सपा, बसप आणि आरएलडी या उत्तर प्रदेशातल्या पक्षांची तुलना 'सराब' म्हणजे दारूशी केली. यावर नरेंद्र मोदींवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. 'समाजवादी पक्षाचा 'स', राष्ट्रीय लोकदलाचा 'र' आणि बहुजन समाजवादी पक्षाचा 'ब' या तीन पक्षांची आद्याक्षरे मिळून सराब शब्द तयार होतो. ही दारू तुमचा नाश करेल. उत्तर प्रदेशच्या हितासाठी शराब म्हणजेच दारू चांगली नाही. देशहितासाठी शराब म्हणजेच दारू चांगली नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर शरसंधान साधलं होतं.