टोपी आणि शिट्टी आणून देतो, चौकीदारी करा; अकबरुद्दीन ओवेसींचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:17 PM2019-03-25T12:17:27+5:302019-03-25T12:20:31+5:30
चौकीदार नरेंद्र मोदींवर अकबरुद्दीन ओवेसींची टीका
हैदराबाद: लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय नेत्यांच्या प्रचाराला धार चढू लागली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कायम हल्लाबोल करणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी आता चौकीदार शब्दावरुन जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मोदींनी माझ्याकडे यावं. मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन, असा खोचक टोला ओवेसींनी लगावला आहे.
सध्या भाजपाचं मै भी चौकीदार कॅम्पेन जोरात आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी या कॅम्पेनला सुरुवात केली. मोदींच्या या कॅम्पेनवर वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींनी टीका केली आहे. 'मी ट्विटरवर चौकीदार नरेंद्र मोदी पाहिलं. त्यांनी त्यांच्या आधार कार्ड आणि पासपोर्टवरसुद्धा चौकीदार असा उल्लेख करायला हवा. आम्हाला पंतप्रधान हवा आहे. चहावाला, पकोडेवाला नको. मोदींना खरंच चौकीदार होण्यात रस असेल, तर त्यांनी माझ्याकडे यावं. मी त्यांना चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देतो,' अशा शब्दांमध्ये ओवेसींनी मोदींवर निशाणा साधला.
AIMIM's Akbaruddin Owaisi in Hyd y'day: I've seen on Twitter 'Chowkidar Narendra Modi'.He should also mention 'Chowkidar' in his Aadhaar card, &passport.Want a PM not a 'Chaiwala','Pakodewala'...If Modi is interested,he should come to me,I'll offer him a Chowkidar's cap&a whistle pic.twitter.com/4ibLgayM0X
— ANI (@ANI) March 25, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके कोण आहेत, हे मला कळतच नाही, असं अकबरुद्दीन ओवेसी एका जनसभेला संबोधित करताना म्हणाले. 'मोदी कधी चहावाला होतात. तर कधी वेगळ्याच रुपात दिसतात. आता निवडणुकीच्या आधी ते चौकीदार झाले आहेत. मोदींनी आधी स्वत:ला चहावाला म्हणवून घेत देशाची दिशाभूल केली. आता चौकीदार होऊनही तेच केलं जात आहे. मी चहाची किटली, गॅस देतो. मोदींनी चहा तयार करुन द्यावा, असं आधी मी म्हटलं होतं. त्यावेळी ते स्वत:ला चहावाला म्हणवून घ्यायचे. आता मोदी चौकीदार झालेत. त्यामुळे आता मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन. त्यांनी देशाची चौकीदारी करावी,' असा टोला त्यांनी लगावला.