Lok Sabha Election 2019: अकोला सोडले नाही; सोलापुरात लढणार- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:40 AM2019-03-12T04:40:28+5:302019-03-12T04:40:52+5:30
आज भूमिका जाहीर करणार
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी माझी उमेदवारी सोलापुरातून जाहीर केली आहे. मी सोलापुरातून लढावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे; मात्र मी अकोला सोडलेले नाही, असे स्पष्ट करीत उमेदवारी तसेच महाआघाडीमधील समावेश याबाबत मंगळवार, १२ मार्च रोजी मुंबईत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती भारिप - बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
पत्रकार परिषदेत अॅड.आंबेडकर म्हणाले की, मी सोलापुरातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा बहुजन वंचित आघाडीची आहे. आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी तसे जाहीरही केले आहे; मात्र निवडणूक कुठून लढवणार, यासंदर्भात मंगळवारी भूमिका स्पष्ट करणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस महाआघाडीमधील समावेशासंदर्भात अजूनही चर्चा सुरूच आहे. काँग्रेस आता सहा जागांपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत होत असलेली मतांची उभी फूट यापुढे होणार नाही, तर सर्वसमान्य, बहुजन मतांची अन् त्यांच्या विकासाची भूमिका राजकीय पक्षांना मांडावीच लागणार असल्याचा दावाही त्यांनी व्यक्त केला.
विदर्भात एकाच टप्प्यात निवडणूक घ्या
विदर्भातील सर्वच मतदारसंघाची निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. विदर्भात एकाच टप्प्यात निवडणूक होणे हे प्रशासकीय दृष्ट्याही सोयीचे होईल,अशी भूमिका अॅड. आंबेडकर यांनी मांडली.