आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके..; आशिष शेलारांचा पवारांना काव्यमय टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 11:24 AM2019-03-27T11:24:15+5:302019-03-27T11:39:24+5:30
पवार कुटुंबातील घडामोडींवरुन आशिष शेलारांचा चिमटा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी कवितेतून टोला लगावला आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून घेतलेली माघार, पार्थ पवार यांना देण्यात आलेली उमेदवारी यावरुन शेलार यांनी चिमटा काढला आहे. त्यासाठी त्यांनी दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचा आधार घेतला आहे. 'आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके.. आजोबांच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके..', असा टोला शेलार यांनी लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबात सुरू असलेल्या घडामोडींवरुन आशिष शेलार यांनी एक ट्विट करुन निशाणा साधला. 'एक नातू म्हणाला आजोबा आजोबा निवडणुका तुम्हीच लढवा...दुसरा नातू म्हणाला आजोबा आजोबा मीच "पार्थ" मीच लढणार... आजोबांना होती ताईंची काळजी...दादांना पोराची.. जाणते आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके.. मुके.. आजोबांच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके!', असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एक नातू म्हणाला आजोबा आजोबा निवडणुका तुम्हीच लढवा...दुसरा नातू म्हणाला आजोबा आजोबा मीच "पार्थ" मीच लढणार...आजोबांना होती ताईंची काळजी...दादांना पोराची.. जाणते आजोबा नातवंडांसमोर मुके.. मुके.. मुके.. आजोंबाच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके!#ChokidarकेSideEffects
— Chowkidar ashish shelar (@ShelarAshish) March 27, 2019
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. पण अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक लढवायची असल्यानं एकाच कुटुंबातून किती जण निवडणूक लढवणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. याशिवाय गेल्या निवडणुकीत बारामतीमधून अतिशय निसटता विजय मिळवणाऱ्या सुप्रिया सुळेंसमोर यंदाही आव्हान असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आशिष शेलारांनी पवारांना राजकीय टोला लगावला आहे.