रांग मोडून मतदान; साक्षी महाराजांच्या मुजोरीमुळे मतदार संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 12:03 PM2019-04-29T12:03:11+5:302019-04-29T12:05:39+5:30
रांगेतील मतदारांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
उन्नव: भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी रांग मोडून मतदान केल्याबद्दल सर्वसामान्य मतदारांनी संताप व्यक्त केला. उत्तर प्रदेशातल्या उन्नवचे खासदार असलेल्या साक्षी महाराज यांनी मतदान केंद्राबाहेर रांग असतानाही थेट प्रवेश केला. त्यामुळे रांगेत शिस्तीनं उभ्या असलेल्या मतदारांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळी आठच्या सुमारास भाजपाचे खासदार साक्षी महाराज मतदान केंद्रावर पोहोचले. साक्षी महाराज यांना भाजपानं पुन्हा एकदा उन्नवमधून उमेदवारी दिली आहे. साक्षी महाराज मतदान केंद्रावर पोहोचले, त्यावेळी मतदान केंद्राबाहेर रांग होती. मात्र साक्षी महाराज रांगेत उभे न राहता थेट मतदान केंद्रात शिरले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये मतदान करुन निघून गेले. साक्षी महाराजांच्या या मुजोर वृत्तीबद्दल रांगेत उभ्या असलेल्या अनेकांनी संताप व्यक्त केला.
साक्षी महाराजांनी रांगेत उभं न राहता थेट मतदान केल्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीनं रांगेत उभ्या असलेल्या काहीजणांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रांगेत उभे राहतात. तर मग साक्षी महाराज का उभे राहू शकत नाहीत, असा सवाल एका मतदारानं उपस्थित केला. तर दुसऱ्या मतदारानं रांगेत उभे राहणारे वेडे आहेत का, असा प्रश्न विचारला.