Lok Sabha Election 2019: उमेदवारीवरून भाजपात घमासान; काही खासदारांवर टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:31 AM2019-03-12T04:31:13+5:302019-03-12T04:31:52+5:30
भाजपाकडून पुण्यात कोण; लातूरमध्ये उमेदवार बदलण्याचा निलंगेकर यांचा आग्रह
- यदु जोशी
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सत्तारुढ भाजपात उमेदवारीवरून घमासान सुरू झाले आहे. सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्यासह काही विद्यमान खासदारांचे तिकिट कापले जाऊ शकते.
पुणे मतदारसंघातून लढण्याची तेथील पालकमंत्री गिरीश बापट यांची तीव्र इच्छा असून त्यांनी तसे पक्षाला कळविलेदेखील आहे. भाजपाचे सहयोगी राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी रविवारी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण सध्या वेगळ्या घडमोडी घडल्याने काकडे यांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. मात्र काकडे यांचे मनपरिर्वतन केल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर याबाबत आपण कोणतीही भूमिका अद्याप न घेतल्याचे काकडे यांनी सांगितले.
लातूरमध्ये विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांच्या उमदेवारीला तेथील पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तीव्र विरोध दर्शविला असल्याची माहिती आहे. गायकवाड यांनी भाजपा कार्यालयात येऊन आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. गोंदिया-भंडारा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाने पोवार समाजाचे हेमंत पटले यांना उमेदवारी दिली होती व त्यांचा राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी पराभव केला होता. यावेळी कुणबी समाजाला संधी द्यावी, असा विचार भाजपात असून त्या दृष्टीने विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके, माजी आमदार रमेश कुथे, भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांची नावे विचाराधीन आहेत. इतरही सोलापूरमध्ये बनसोडे यांच्याऐवजी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, हे निश्चित आहे.
वर्धा मतदारसंघात विद्यमान खा. रामदास तडस यांना डावलून गेल्या वेळचे काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांना संधी दिली जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. तडस हे तेली समाजाचे आहेत आणि पूर्व विदर्भात हा समाज मोठ्या संख्येने आहे. तडस यांना डावलल्याने या समाजाची नाराजी ओढावू शकते.
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या दिवसभर बैठका
भाजपाच्या मुंबई कार्यालयात आज दिवसभर बैठकींचा धडाका सुरु होता. आधी निवडणूक यंत्रणा समितीच्या जिल्हावार बैठकी झाल्या. सायंकाळी ज्येष्ठ नेत्यांची पुन्हा एक बैठक झाली. दोन्ही बैठकींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.