ना अडवाणी, ना अटल; संकल्पपत्रात भाजपाला ज्येष्ठांचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 03:38 PM2019-04-08T15:38:26+5:302019-04-08T15:49:12+5:30
5 वर्षांमध्ये बदलला भाजपाच्या जाहीरनाम्याचा चेहरामोहरा
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज संकल्पपत्र जाहीर केलं. भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, संकल्पपत्र समितीचे प्रमुख राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भाजपानं व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलं. यावेळी भाजपाचं व्यासपीठ 2014 च्या तुलनेत पूर्णपणे बदललं होतं. यावेळी मंचावर वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अनुपस्थित होते. 2014 आणि 2019 मधील भाजपाच्या संकल्पपत्रांची तुलना केल्यास बरेच बदल जाणवतात.
संकल्पपत्र प्रसिद्ध करताना पंतप्रधान मोदी, अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संघटनमंत्री रामलाल आणि केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत उपस्थित होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र ते नागपुरातील प्रचारात व्यस्त असल्यानं उपस्थित राहू शकले नाहीत.
2014 च्या तुलनेत किती बदललं व्यासपीठ?
पाच वर्षांपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, रविशंकर प्रसाद, जेपी नड्डा उपस्थित होते. मात्र हे नेते यंदा हजर नव्हते.
व्यासपीठासोबतच संकल्पपत्राच्या मुखपृष्ठातही बदल
यंदाच्या भाजपाच्या संकल्पपत्रावर नजर टाकल्यास सबकुछ मोदी असं चित्र आहे. संकल्पपत्राच्या मुखपृष्ठावर केवळ मोदींचा फोटो आहे. भाजपानं फिर एक बार मोदी सरकार अशी घोषणा दिली आहे. त्यामुळे पक्ष यंदाही मोदींच्या नावे मतं मागणार हे स्पष्ट आहे. या संकल्पपत्राच्या शेवटच्या पानावर शामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयींचा फोटो आहे.
गेल्या निवडणुकीतलं मुखपृष्ठ कसं होतं?
2014 मधील भाजपाच्या जाहीरनाम्यावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह (तत्कालीन पक्षाध्यक्ष) यांचे फोटो होते. यानंतर नरेंद्र मोदी (पंतप्रधान पदाचे उमेदवार), अरुण जेटली, सुषमा स्वराज, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मुरली मनोहर जोशी, रमण सिंह, मनोहर पर्रीकर यांचे फोटो होते. भाजपानं तेव्हाच्या जाहीरनाम्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना स्थान दिलं होतं. आता वाजपेयी आणि पर्रीकर या जगात नाहीत. शिवराज सिंह, वसुंधरा राजे आणि रमण सिंह हे तीन नेते आता मुख्यमंत्री नाहीत.