26 तारखेला शपथ घेणार मोदी? तारखेमागे अनोखं गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 07:54 PM2019-05-21T19:54:27+5:302019-05-21T19:56:21+5:30
मोदी 26 तारखेला शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. भाजपाला धक्का बसल्यास संधी साधण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखली आहे. तर भाजपानं एनडीएतील सहकाऱ्यांसोबत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची तयारी सुरू केली आहे. आज भाजपानं दिल्लीत एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांसाठी डिनरचं आयोजन केलं आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. यानंतर तिसऱ्याच दिवशी म्हणजेच 26 मे रोजी मोदी शपथ घेऊ शकतात. 8 हा आकडा मोदींसाठी शुभ आहे. 26 या तारखेतील दोन अंकांची बेरीज 8 होते. त्यामुळे मोदी 26 तारखेला शपथ घेतील, अशी चर्चा दिल्लीत आहे. 2014 मध्येही मोदींनी 26 तारखेलाच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता.
भाजपानं आज एनडीएमधील घटक पक्षांची बैठक घेतली. या बैठकीत आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. रविवारी मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर आलेल्या विविध एक्झिट पोल्सनी भाजपाच सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तवला. तेव्हापासून भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपानं मित्र पक्षांसाठी आज डिनरचं आयोजन केलं आहे.