VIDEO: घरात 9 माणसं असूनही पाचच मतं; उमेदवाराला कॅमेऱ्यासमोरच रडू कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 09:23 PM2019-05-23T21:23:42+5:302019-05-23T21:27:56+5:30
अपक्ष उमेदवाराला अश्रू अनावर
जालंधर: लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. देशाच्या जनतेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना सत्ता दिली आहे. विशेष म्हणजे यंदा भाजपा आणि मित्र पक्षांना गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला पुन्हा एकदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसला पन्नासच्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात निराशा आहे.
तीनशेचा टप्पा पार केल्यानं भाजपाचे नेते, कार्यकर्ते आनंदात असताना जालंधरमधील एक व्यक्ती मात्र अतिशय दु:खात आहे.
जालंधरमध्ये एका व्यक्तीनं अपक्ष निवडणूक लढवली होती. आपल्याला किती मतं मिळाली ते पाहण्यासाठी तो मतमोजणी केंद्रावर गेला. त्या व्यक्तीला केवळ पाच मतं मिळाली. त्यामुळे त्याला अतिशय दु:ख झालं. या व्यक्तीच्या कुटुंबात एकूण 9 सदस्य आहेत. त्यामुळे मला पाचच मतं कशी मिळू शकतात, असा प्रश्न या व्यक्तीला पडला. घरात 9 सदस्य असूनही केवळ 5 मतं मिळाल्यानं या व्यक्तीला अक्षरश: रडू कोसळलं.
Iss independent candidate ko total 5 votes padi hain aur iske ghar mein 9 log hain😂😂😂😂😂😂😂😂😭😭😭 pic.twitter.com/E6f9HJXCYA
— Rishav Sharma (@rishav_sharma1) May 23, 2019
जालंधरमधील या अपक्ष उमेदवाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका पंजाबी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीनं या उमेदवाराशी बातचीत केली. त्यात या उमेदवारानं स्वत:ची व्यथा मांडली. 'मला केवळ 5 मतं मिळाली. पण माझ्या तर घरात 9 मतदार आहेत,' असं म्हणून ही व्यक्ती धाय मोकलून रडू लागली. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्यानं आपली मतं कमी झाली, असा दावा त्यानं केला. यापुढे आयुष्यात कधीच निवडणूक लढवणार नाही, असा पणदेखील त्यानं यावेळी केला.