Lok Sabha Election 2019: हातकणंगलेतून सदाभाऊ खोत यांना उतरवण्याच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:54 AM2019-03-12T04:54:24+5:302019-03-12T04:54:52+5:30
हातकणंगले मतदारसंघ ‘रयत क्रांती’ला देऊन तेथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरवण्याच्या प्रस्तावाला सोमवारी मुंबईत जोर आला.
- समीर देशपांडे
कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघ ‘रयत क्रांती’ला देऊन तेथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरवण्याच्या प्रस्तावाला सोमवारी मुंबईत जोर आला. या मतदारसंघामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे वारणा समूहाचे नेते आणि जनसुराज्यचे संस्थापक विनय कोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली असून, तसा प्रस्ताव आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार आहे.
शिवसेनेकडून हातकणंगले मतदारसंघासाठी धैर्यशील माने यांचे नाव निश्चित केल्याचे सांगण्यात येते. मात्र धैर्यशील किंवा त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यावी, याबाबत शिवसेनेमध्ये दोन मतप्रवाह आहेत. या पार्श्वभूमीवर धैर्यशील यांच्याऐवजी खासदार राजू शेट्टी यांना त्यांच्या मतदारसंघात जखडून ठेवण्यासाठी सदाभाऊ खोत अधिक उपयुक्त ठरू शकणार असल्याने त्यांनाच उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विनय कोरे यांना सोमवारी तातडीने मुंबईत बोलावून घेतले. फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनय कोरे यांच्यात याबाबत चर्चा झाली. कोरे यांची शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले तालुक्यात प्रामुख्याने ताकद आहे. ही ताकद वापरताना कोरे यांचीही राजकीय अडचण होऊ नये, यासाठी हा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, सत्तेत सहभागी असलेल्या रयत क्रांती संघटनेला हातकणंगले जागा शिवसेनेने सोडावी, असा प्रस्ताव आता मुख्यमंत्र्यांकडून उद्धव ठाकरेंना दिला जाणार आहे.