Lok Sabha Election 2019: शरद पवार यांचा ‘मावळ’कडे मोर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:53 AM2019-03-15T04:53:06+5:302019-03-15T04:53:34+5:30
पवार मावळातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे.
- हणमंत पाटील
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यानंतर आता मावळ मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळविला आहे. आता मावळातून ते निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीची पहिली नऊ उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीत पुणे जिल्ह्यातील मावळ व शिरूर मतदार संघातील उमेदवारांची नावे गुलदस्तात आहेत. चार दिवसांपूर्वी पवार यांनी मावळ मतदारसंघातून कुटुंबातील नव्या पिढीला संधी देणार असल्याचे सूचक विधान करीत पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. मात्र, दोनच दिवसांनंतर त्यांनी यूटर्न घेतला आहे.
मावळ मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड पदाधिकारी व नगरसेवकांशी त्यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी मावळमध्ये पार्थ यांच्या उमेदवारीचा पुनरुच्चार न करता, उमेदवार कोणीही असो, कार्यकर्त्यांना प्रचार सुरू करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, अजित पवार यांनीही पनवेल येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत पार्थ यांची उमेदवारी जाहीर केलेली नसल्याचे स्पष्ट करीत यादीतून नावे जाहीर होतील, असे सूचक विधान केले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीविषयीचा संभ्रम वाढला आहे.
शरद पवार व अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उमेदवार कोण हे न पाहता पक्ष देईल, त्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा सल्ला एकाच दिवशी दिला. त्यानंतर काही जाणकार व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मावळमधून पार्थ अथवा खुद्द शरद पवार यांनी निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे माढ्यातून माघार घेतलेले पवार आता मावळातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
प्रचाराचा दिला सल्ला
शरद पवार व अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उमेदवार कोण हे न पाहता पक्ष देईल, त्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा सल्ला एकाच दिवशी दिला.