शिवसेनेनं स्वबळाचा नारा खरा 'करून दाखवला'; या राज्यात 'एकला चालो रे'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:30 PM2019-03-29T13:30:21+5:302019-03-29T13:31:26+5:30
15 लोकसभा मतदारसंघात शिवसेना स्वतंत्र लढणार
कोलकाता: भाजपा आणि शिवसेनेनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या गुजरातमधील रोड शोला उपस्थित राहणार आहेत. अमित शहा उद्या गांधीनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करुन लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राज्यातील 48 जागांवर शिवसेना-भाजपानं युती केली असली, तरी पश्चिम बंगालमध्ये शिवसेना स्वबळ आजमावणार आहे. पश्चिम बंगालमधील 42 पैकी 15 जागांवर शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे.
2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं 18 जागा लढवल्या होत्या. मात्र याआधी कधीही शिवसेनेनं पश्चिम बंगालमधून लोकसभा निवडणूक लढवलेली नाही. मात्र यंदा शिवसेनेनं कोलकाता दक्षिण, जादवपूर, बसिरहाट, बारासात, डमडम, बराकपूर, पुरालिया, बिष्णूपूर, मेदिनीपूर, कांठी, उत्तर माल्दा, बिरभूम आणि मुर्शिदाबाद या लोकसभेच्या जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व जागांवर हिंदू उमेदवारच दिले जाणार आहेत. राज्यातील भाजपा तृणमूलयुक्त असल्याचा टोला शिवसेनेचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष अशोक सरकार यांनी केला. 'शारदा, नारदा घोटाळ्यातील आरोपी असलेले तृणमूलचे नेते भाजपात दाखल झाले आहेत. मुकूल राय, संकूदेब पांडा यांची सीबीआयकडून चौकशीदेखील झाली आहे. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला,' असं सरकार म्हणाले.
भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे सत्तेत आली. मात्र आता त्यांना त्याच विषयाचा विसर पडल्याची टीका सरकार यांनी केली. 'त्यांना आता हिंदुत्वाशी काहीही देणंघेणं नाही. त्यामुळे बंगालमध्ये आमचा लढा हिंदुत्व वाचवण्यासाठी आहे. यासाठी आम्ही राज्यात भाजपा आणि तृणमूलविरोधात लढणार आहोत,' असं सरकार म्हणाले. मोदी सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचं म्हणत ममता बॅनर्जींनी ग्रामीण भागात काही चांगली कामं केल्याचं सरकार यांनी सांगितलं.