करकरेंनी एटीएस प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल शंका- सुमित्रा महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 10:24 AM2019-04-30T10:24:56+5:302019-04-30T10:29:45+5:30
सुमित्रा महाजन यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता
भोपाळ: दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या विधानामुळे भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या होत्या. यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात पुन्हा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. करकरे यांनी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल महाजनांनी शंका उपस्थित केली.
'त्यांचं (हेमंत करकरे) कर्तव्यावर असताना निधन झालं. त्यामुळे त्यांना शहीद मानलं जाईल,' असं महाजन म्हणाल्या. मात्र त्यांनी करकरेंच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल संशय व्यक्त केला. महाजन यांनी त्यांच्या विधानातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. महाजन यांच्या विधानाला सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं. 'सुप्रिया ताई, तुम्ही अशोक चक्र विजेत्या हेमंत करकरेंसोबत माझं नाव जोडत आहात, याचा मला अभिमान वाटतो,' अशी प्रतिक्रिया दिग्विजय सिंह यांनी दिली.
सुमित्रा ताई, मुझे गर्व है कि अशोक चक्र विजेता शहीद हेमंत करकरे के साथ आप मुझे जोड़ती हैं।आपके साथी उनका अपमान भले ही करें, मुझे गर्व है कि मैं सदैव देशहित, राष्ट्रीय एकता और अखंडता की बात करने वालों के साथ रहा हूँ। https://t.co/6vD0i0UZF2
— digvijaya singh (@digvijaya_28) April 29, 2019
काँग्रेसचे भोपाळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेल्या दिग्विजय सिंह यांनी भाजपावर शरसंधान साधलं. 'सुमित्रा ताई, तुमचे साथीदार जरी करकरेंचा अपमान करत असले, तरी मी सदैव देशहित, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा पुरस्कार करणाऱ्यांसोबत राहीन. मी कायम धार्मिक उन्माद पसरवणाऱ्यांच्या विरोधात असेन. मी मुख्यमंत्री असताना सिमी आणि बजरंग दल या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. ते धाडस मी दाखवलं, याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी देश सर्वात आधी येतो. घाणेरडं राजकारण करण्यात मला रस नाही,' अशा शब्दांमध्ये दिग्विजय सिंह यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला.