पवारांची पॉवर दिसणार; सुप्रिया सुळे, पार्थ पवार जिंकणार- सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 19:16 IST2019-05-20T19:13:50+5:302019-05-20T19:16:19+5:30
बारामती, मावळमध्ये राष्ट्रवादी जिंकणार असल्याचा अंदाज

पवारांची पॉवर दिसणार; सुप्रिया सुळे, पार्थ पवार जिंकणार- सर्व्हे
मुंबई: लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाले. या सर्वच पोल्समधून देशात एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. या निवडणुकीत पवार कुटुंबाचं काय होणार, याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि नातू पार्थ पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारामतीतून निवडणूक लढवत असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर भाजपाच्या कांचन कुल यांचं आव्हान आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीला यंदा खिंडार पाडण्याचे दावे भाजपा नेत्यांनी केले होते. त्यासाठी भाजपाचे अनेक दिग्गज नेते बारामतीत तळ ठोकून होते. मात्र बारामती यंदाही पवारांना साथ देणार असल्याचं एबीपी नेल्सनच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि शरद पवारांचे नातू मावळमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचं आव्हान आहे. पार्थ पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवार यांनी पार्थ यांच्यासाठी मतदारसंघ पिंजून काढला होता. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल आणि पार्थ निवडून येतील, असा अंदाज एबीपी नेल्सनच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.