Lok Sabha Election 2019: तिसऱ्या टप्प्यात दिग्गज मैदानात; 14 मतदारसंघात 10 विद्यमान खासदारांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 04:17 AM2019-04-22T04:17:20+5:302019-04-22T04:18:37+5:30

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांत मंगळवारी मतदान होत असून, रविवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या.

Lok Sabha Election 2019: In the third leg of the legendary field; 10 existing MPs in 14 constituencies get the honor | Lok Sabha Election 2019: तिसऱ्या टप्प्यात दिग्गज मैदानात; 14 मतदारसंघात 10 विद्यमान खासदारांची प्रतिष्ठा पणाला

Lok Sabha Election 2019: तिसऱ्या टप्प्यात दिग्गज मैदानात; 14 मतदारसंघात 10 विद्यमान खासदारांची प्रतिष्ठा पणाला

Next

लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांत मंगळवारी मतदान होत असून, रविवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. या टप्प्यात विद्यमान १० खासदार पुन्हा आपले भाग्य आजमावित आहेत. बारामती, अहमदनगर, माढा या मतदारसंघांतील लढती यंदा राज्यभर विशेष चर्चेत आहेत. एक-दोन अपवाद वगळता इतर ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत. महिला व तरुण मतदारांची संख्याही महत्त्वाची ठरणार आहे.

जालना : भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत
जालना : लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात थेट लढत होत आहे. बहुजन वंचित आघाडीच्या वतीने डॉ. शरदचंद्र वानखेडे हे उमेदवार असून, ते किती टक्कर देतात. यावरही काँग्रेस व भाजपचे समीकरण ठरणार आहेत. दानवे सलग पाचव्यांदा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची आहे. दरम्यान, काँग्रेसने पुन्हा एकदा विलास औताडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा आणि दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा किती परिणाम होतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे जालन्याकडे राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

औरंगाबाद : चौरंगी लढतीत काय होणार ?
औरंगाबाद : शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील आणि शिवस्वराज्य पक्षाचे आ. हर्षवर्धन जाधव यांच्यात प्रमुख लढत होत आहे. एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने औरंगाबाद शहरातील पाण्याचा मुद्दा गाजला. विविध पक्षांच्या प्रचारसभांमध्येही त्याचा उल्लेख झाला. राष्टÑीय मुद्द्यांचा इथे प्रभाव जाणवला नाही. मुद्द्यांवर आधारित प्रचार या मतदारसंघात झालेला नाही. जाती-धर्माच्या आधारावर काही पक्षांकडून मतांची जुळवणी करण्याचा प्रयत्न होताना दिसला.

अहमदनगर : भाजपसमोर गड कायम राखण्याचे लक्ष्य
अहमदनगर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे आणि अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील लढत अटीतटीची आहे. मतदारसंघातील दुष्काळ, बेरोजगारी, पाणीप्रश्न प्रचारात चांगलाच तापला. विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक, मुख्यमंत्र्यांच्या तीन, पंकजा मुंडे यांच्या दोन सभा झाल्या. जगताप यांच्यासाठी शरद पवार व धनंजय मुंडे यांनी प्रत्येकी तीन सभा घेतल्या. राधाकृष्ण विखे यांनी मुलासाठी केलेला छुपा प्रचार विशेष चर्चेत होता. राष्ट्रवादीने मोदी सरकारच्या अपयशाचे पाढे वाचले, तर भाजपने पाच वर्षांतील कामगिरी जनतेसमोर ठेवली. शेवटी प्रचार वैयक्तिक पातळीवर उतरला.

पुणे : पारंपरिक मतदानावर दोघांची भिस्त
पुणे : पुण्यात सलग दुसऱ्यांदा भाजपला विजय मिळत नाही, हा लोकसभा निवडणुकीतला इतिहास पुसून टाकण्यासाठी गिरीश बापट यांनी कंबर कसली आहे. सुरुवातीपासूनच प्रचारात जोरदार आघाडी घेऊन त्यांनी चांगली वातावरण निर्मिती केली. मुख्यमंत्री, तीन केंद्रीय मंत्री, रामदास आठवले या प्रमुखांनी बापट यांच्यासाठी प्रचार केला. तुलनेने काँग्रेस महाआघाडीच्या मोहन जोशी यांना अपेक्षित कुमक राज्य, केंद्र स्तरावरून मिळालेली नाही. तरीही अखेरच्या टप्प्यात जोशींनी शहर पिंजून काढत प्रचारात जान आणली. गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद घसरत आलेली आहे. दुसºया बाजूने भाजपची संघटनात्मक ताकद वाढत गेली आहे. मात्र, कुंपणावरचे आणि नवमतदार यांचा कल अस्पष्ट आहे.
या पार्श्वभूमीवर अनुकूल पारंपरिक मतदारांना घराबाहेर काढून त्यांचे मतदान करून घेण्यात कोणता पक्ष अधिक यशस्वी होतो, यावर निकाल ठरेल.

बारामती : पवारांवर हल्ला करत सुप्रिया सुळेंना आव्हान
पुणे : बारामतीचा गड काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शरद पवारांवर हल्ला करण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांच्यात चुरशीची लढाई होणार आहे. भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाने सभा घेतल्या. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तळ ठोकून बसले होते. शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, हर्षवर्धन पाटील भाजपला उत्तर देत आहेत. जिरायती भागातील पाण्याचा प्रश्न उपस्थित करून बारामतीचा विकास झाला नाही, असा प्रचार भाजप करत आहे. मोदी सरकारची शेतकरीविरोधी धोरणे, ढासळलेली अर्थव्यवस्था हे राष्टÑवादीचे प्रचाराचे मुद्दे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रद्द झाल्याने ही नुरा कुस्ती ठरणार अशी अफवा पसरली. त्याला उत्तर देण्यासाठी अमित शहा यांनी सभा घेतली.

माढा : दोन मित्र आले आमने-सामने
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात लढत होत आहे. खºया अर्थाने ही लढत शरद पवार वि. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशीच आहे. भाजपने आपले सर्व पत्ते खुले केले असून, राष्टÑवादीला चहुबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच वेळी राष्टÑवादीनेही हा आपला बालेकिल्ला कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. ही जागा दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. नरेंद्र मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. माढा, सांगोला, करमाळा, माळशिरस, माण, फलटण तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश आहे. एकेक ाळचे मित्र असणाºया या दोन्ही उमेदवारांमधील ही लढत रंगतदार ठरली आहे.


कोल्हापूर : महाडिकांची पक्षविरोधी भूमिका कळीचा मुद्दा
कोल्हापूर : लोकसभा मतदारसंघात या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यातच निकराची झुंज होत आहे. या मतदारसंघात ‘महाडिक नकोत’ अशी लोकभावना तयार झाल्याने विजयाचा दावा मंडलिक यांनी केला आहे. गेल्या वेळेस मोदी लाट असतानाही दोन्ही काँग्रेसच्या एकजुटीमुळे महाडिक विजयी झाले. निवडून आल्यानंतर मात्र, भाजपच्या प्रेमामुळे त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या विरोधात उघड भूमिका घेतली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय...’ ही भूमिका घेऊन त्यांच्याविरोधात उघड रान पेटविल्याने लढतीला धार आली. ‘काम करणारा खासदार’ ही प्रतिमा व स्वगटाच्या ताकदीवर मैदान मारू, असा विश्वास महाडिक यांना वाटतो.

सातारा : उदयनराजे-नरेंद्र पाटील समोरासमोर
सातारा : आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यातच मोठी लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत निवडणूक अधिक औत्सुक्याची केली. सुरुवातीच्या टप्प्यात एकांगी वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात दुरंगी झाली आणि उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. नरेंद्र पाटील यांनी थेट उदयनराजे भोसले यांच्यावर आरोप करत औद्योगिक विकास नाही, बेरोजगारी आणि दहशत वाढविल्याच्या मुद्द्यांवर बोट ठेवले. उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत, नरेंद्र पाटील हे वर्षातून एकदाच येणारे यात्रेकरू आहेत. मी कायम तुमच्यासाठी तत्पर असतो, अशी भावनिक साद घालत मतदारांना आपले करण्याचा प्रयत्न केला .

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : निष्ठावंत, नाराजांमधील लढाई
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत, स्वाभिमानचे नीलेश राणे आणि काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यासह एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मुख्य लढत विनायक राऊत आणि नीलेश राणे यांच्यामध्येच होणार आहे. त्यात शिवसेनेचा भर आपल्या वर्षानुवर्षांच्या पायावर असून, स्वाभिमानचा भर मात्र भाजप, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षातील नाराजांवर आहे. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ५ ठिकाणी शिवसेनेचे, तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे.
रत्नागिरीत शिवसेना आणि सिंधुदुर्गात स्वाभिमान पक्ष सक्षम आहे. रत्नागिरीतील मतदार ७ लाख ८0 हजार आणि सिंधुदुर्गातील मतदार ६ लाख ६0 हजार आहेत.

सांगली : व्यक्तिगत आरोपांत विकासाचे मुद्दे हरविले
सांगली : काँग्रेस-राष्टÑवादीच्या महाआघाडीत ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली असून, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील उमेदवार आहेत. महाआघाडीच्या सर्व नेत्यांना एकत्र करून त्यांनी त्यांच्या ताकदीचा उपयोग प्रचारात करून घेतला आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यासाठी पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन वातावरण तापवले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीमुळे कमालीची चुरस निर्माण झाली आहे.
व्यक्तिगत पातळीवर टीका झाल्याने प्रचारातून विकासाचे मुद्देच हरविले. भाजप सरकारच्या अपयशावर महाआघाडी आणि वंचित आघाडीने जोरदार हल्ला चढविल्याचे दिसून आले.

हातकणंगले : शेट्टी यांची ‘राष्ट्रवादी’शी संगत केंद्रस्थानी
हातकणंगले : लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बदललेली राजकीय भूमिका या निवडणुकीत केंद्रबिंदू झाली आहे. आतापर्यंत तुम्ही साखर कारखानदारांना व मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसला चोर म्हणत होता. आता त्यांचा पाठिंबा कसा चालतो, अशी विचारणा त्यांना होत आहे.
‘मोदी यांच्यावर बोचरी टीका करणारा देशातील प्रमुख नेता’ अशी शेट्टी यांची प्रतिमा तयार झाल्याने, भाजपने त्यांच्या पराभवासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. शिवसेनेने येथे धैर्यशील माने या नवख्या उमेदवारास संधी दिली आहे. शेट्टी या निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करतात का, याबद्दल लोकांत उत्सुकता आहे. शेतकरी चळवळीमुळे त्यांची ओळख देशभर झाली आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी या निवडणुकीतही त्यांच्या पाठीशी किती निष्ठेने राहतो, याकडे राज्याचे आणि देशभरातील चळवळीतील लोकांचे लक्ष आहे.

जळगाव : शेवटच्या टप्प्यात चुरस वाढली
जळगाव : लोकसभा मतदारसंघात रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांमध्ये खरी लढत ही भाजपचे आमदार उन्मेष पाटील व राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यातच असल्याचे लक्षात येते. भाजपच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील अमळनेर येथे पहिली सभा घेतली. राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एरंडोल येथे सभा घेतली. अमळनेर येथे भाजपने आयोजित केलेल्या युतीच्या मेळाव्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व्यासपीठावर माजी आमदार व माजी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केल्याचा मुद्दा राज्यभर गाजला. यासह पक्षाने ऐनवेळी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी कापून आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिल्याचा मुद्दाही प्रचंड वादग्रस्त ठरला. मात्र, उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील एकत्र आले आहेत. युतीतील दुरावा यामुळे बराच कमी झालेला दिसत आहे. आघाडीही शेवटच्या टप्प्यात एकीने प्रचाराला लागलेली दिसते.

रावेर : भाजप व काँग्रेसमध्येच खरी लढत
जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस की राष्ट्रवादी हा तिढा कायम असताना अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघात खरी लढत ही भाजपच्या रक्षा खडसे व काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्यात आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात व्यग्र असतानाच जिल्हाभरात स्टार प्रचारकांच्याही सभा झाल्या़ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भुसावळ येथे सभा झाली, तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सर्वत्र प्रचारात सहभागी झाले. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची नांदुरा, तर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची चोपडा येथे सभा झाली. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कुºहा येथे सभा झाली़ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भुसावळ व मुक्ताईनगर येथे प्रचार सभा झाली.

रायगड : शिवसेना व राष्टÑवादीत सामना
रायगड : लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार अनंत गिते यांना या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अतिशय तगडे आव्हान दिले आहे. उभय उमेदवारांच्या प्रचार सभांकरिता केंद्रीय स्तरावरील शरद पवार, नितिन गडकरी यांच्या बरोबरच राज ठाकरे हे नेते प्रचारामध्ये उतरले होते. आरोप प्रत्यारोपाच्या सभांपेक्षा घरोघरच्या
प्रचारातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचले असल्याचा दावा उमेदवारांचा आहे. दरम्यान, तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे दोन अपक्ष तटकरे उमेदवार काही काळ बेपत्ता झाले आणि रायगडमधील नामसाधर्म्याच्या उमेदवारांच्या राजकीय क्लृप्तीने यंदा वेगळेच वळण घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेताच ते दोघेही हजर झाले. काँग्रेस-शेकापच्या पाठबळावर सुनील तटकरे यंदा विजयाचा खात्रीशीर दावा करत आहेत, तर शिवसेनाचे अनंत गीते यांनी जनता जनार्दनच मला पुन्हा खासदार करणार, अशी भूमिका व्यक्त केली आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: In the third leg of the legendary field; 10 existing MPs in 14 constituencies get the honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.