Lok Sabha Election 2019: भावनाताई हटावसाठी तीन ‘भाऊ’ एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:33 AM2019-03-12T04:33:56+5:302019-03-12T04:34:26+5:30
सेनेचे राज्यमंत्री भाजपाच्या कार्यालयात; उद्धव ठाकरेंकडे शब्द टाकण्याची मुख्यमंत्र्यांना गळ
मुंबई : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपाचे राज्यमंत्री मदन येरावार, शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड आणि भाजपाचे आमदार राजेंद्र पटणी यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. गवळी हटावसाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकावा, अशी गळ त्यांनी घातली.
काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. संजय राठोड आणि राजेंद्र पटणी हे भावना गवळी यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यातच राठोड आणि ठाकरे हे दीर्घ काळापासून एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. माणिकराव वा इतर कोणीही काँग्रेसचे उमेदवार असले तरी ताई नकोच अशी भूमिका येरावार, राठोड व पटणी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. साकडे घालण्यासाठी हे तिघे भाजपाच्या मुंबई कार्यालयात दुपारी धडकले. भावनातार्इंच्या विरोधात ‘अँटिइन्कम्बन्सी फॅक्टर’ आहे, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
‘भावना गवळी चांगल्या उमेदवार आहेत पण त्यांना पर्याय द्यायचा असेल तर संजूभाऊ तुम्ही स्वत: लढायला पाहिजे आणि तुम्ही लढणार असाल तर मी उद्धवजींकडे शब्द टाकण्याचा विचार करीन असा गुगली मुख्यमंत्र्यांनी टाकला. स्वत: लढण्याबाबत संजय राठोड द्विधा मनस्थितीत आहेत. मी लढायला घाबरत नाही व जिंकल्याशिवाय राहणार नाही, या शब्दात राठोड यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
...तर पुन्हा मंत्रिपद
सूत्रांनी सांगितले की, खासदार झाल्यानंतर केंद्रात आपल्याला मंत्रीपद मिळणार नाही, पण राज्यात पुन्हा भाजपा - शिवसेनेची सत्ता आली तर पुन्हा मंत्रीपद मिळेल, असा राठोड यांचा आशावाद आहे. त्यामुळेच खासदारकीला लढण्याबाबत ते द्विधा मनस्थितीत आहेत.